ट्रिमिक्‍स रस्त्यावरुन अधिकारी, ठेकेदार धारेवर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 March 2021

भाजप नगरसेवकांनी केली पाहणी : महापौरांनी बोलवली बैठक 

सांगली :  शहरातील पहिलाच ट्रिमिक्‍स रस्ता म्हणून गाजावाजा करत सुरु केलेल्या रस्त्याचे काम रेंगाळल्याबद्दल भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. स्वाती शिंदे यांच्यासह प्रभाग 16 व 17 मधील नगरसेवकांनी आज कामाची पहाणी केली. काम बंद ठेवल्याबद्दल शहर अभियंता, शाखा अभियंता यांना जागेवर बोलवून जाब विचारत धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी दीड महिन्यात काम पुर्ण करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही या कामाबाबत अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक बोलवली आहे. 

महापालिकेत भाजपची सत्ता असताना राम मंदिर ते सिव्हिल हॉस्पिटल चौकापर्यंतचा रस्ता आधुनिक पध्दतीने ट्रिमिक्‍स करण्याचे ठरले. या रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मात्र त्यानंतर रस्त्याचे काम रेंगाळत सुरु आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचून राहते त्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्ता खचत होता. यामुळे हा रस्ता सिमेंटचा करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू असून रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. पण, हे काम गेले काही दिवस बंद आहे. या कामाची मुदत सहा असून त्यातील चार महिने संपले आहेत.

 याबद्दल "सकाळ'ने वृत्त प्रसिध्द केल्यावर आज भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई तसेच सुजित राऊत आदींनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाची पाहणी केली. त्यांनी शहर अभियंता संजय देसाई, शाखा अभियंता यांना जागेवर बोलवून काम का रेंगाळले याची माहिती घेतली आणि काम वेळेत पुर्ण करण्याबद्दल सूचना केल्या. वीज वितरणच्या अंडरग्राऊंड केबल व मुरूम उपलब्ध होत नसल्याने काम थांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनीही कामाची पाहणी केली. ठेकेदार व अधिकाऱ्यांनी, विद्युत विभागाच्या अंडरग्राऊंड केबलसाठी वीज वितरण विभागाकडून सहकार्य मिळत नाही. तसेच मुरूम उपलब्ध होत नसल्याने काम रेंगाळल्याचे सांगितले. यावर महापौर सुर्यवंशी यांनी या संदर्भात सोमवारी शहर अभियंता, वीज महामंडळाचे अधिकारी व ठेकेदाराची बैठक घेऊन हा प्रश्न निकालात काढण्याची ग्वाही दिली.  

संपादन- अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers contractors on the edge of Trimix Road sangli marathi news