Diwali festival : ‘दिवाळी’साठी रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

railway

Diwali Festival : ‘दिवाळी’साठी रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल

मिरज : यंदा कोरोना महामारीनंतरची पहिलीच दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठीच्या तयारीला चाकरमानी आणि फिरस्ते महिनाआधीच लागले असून गावी आणि पर्याटनस्थळांना जाण्यासाठी मिरजेतील रेल्वे आरक्षण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. मिरजेतून थेट धार्मिक तीर्थस्थळांसह परराज्यातील पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. अद्याप दिवाळीला महिनाभराचा अवकाश असला तरी ऐनवेळी तिकिटांसाठी धावपळ आणि एजंटांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी महिनाआधीच प्रवाशांकडून दक्षता घेतली जात आहे. ‘सकाळ’कडून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती घेतली असता ऑक्टोबर महिना दिवाळीमुळे पूर्णतः बुक आहे.

यंदा दिवाळी सुटीचा बेत फिरस्त्यांकडून आखला जात आहे. सुटीतील विश्रांती, तसेच शासकीय आणि खासगी नोकरदारांना नव्या प्रवासाचा, निसर्गरम्य वातावरणात सैर करण्यासाठी राज्यासह परराज्यांतील प्रेक्षणीय स्थळे, प्राचीन स्थळे आणि थंडा हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे हा सर्वांत सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. मिरजेतून रेल्वेमार्गे बहुतांश विविध राज्यात जाण्याची सोय आहे. त्यामुळे मिरजेतून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट महिनाभर आदीच आरक्षित झाले आहे. अनेकांचे प्रतीक्षा यादीतील स्थान शंभरीपुढे गेले आहे.

मिरजेतून धावणाऱ्या अनेक लांबपल्ल्यांच्या गाड्या हाऊसफुल्ल आहेत. यामध्ये निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसच्या प्रतीक्षा यादीने शंभरी पार करीत महिना ते दीड महिना बुकिंग फुल्ल आहे, तर ‘हमसफर’सह प्रवाशांची सर्वाधिक पसंती ‘अजमेर’, ‘गांधीधाम’ आणि ‘जोधपूर’ या एक्स्प्रेसना आहे. कोल्हापूर-महाराष्ट्र (गोंदिया) एक्सप्रेस महिनाभर फुल्ल आहे. नोव्हेंबरमध्ये थोड्याप्रमाणात आरक्षण शिल्लक आहे, तर कोल्हापूर-नागपूर २१ आक्टोबरअखेर २०८ पर्यंत प्रतीक्षेत आहे. कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेसचे शंभरीपर्यंत आरक्षण सध्यातरी दिसत आहे. शिवाय पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या कोल्हापूर-कलबुर्गी गाडीस मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

साप्ताहिक आणि नियमित एक्स्प्रेस गाड्या

· गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस · यशवंतपूर-चंदीगड एक्स्पेस

· यशवंतपूर-निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस

· कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस · बंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस

· म्हैसुर-अजमेर एक्स्प्रेस · कोल्हापूर-नागपूर · कोल्हापूर-महाराष्ट्र

· कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी, कोयना एक्स्प्रेस

· कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस · यशवंतपूर-पंढरपूर · हुबळी-दादर

· मिरज-हरिप्रिया · मिरज-बंगळूर

पॅसेंजर गाड्या

· मिरज-परळी · मिरज-कुर्डुवाडी · कोल्हापूर-कलबुर्गी

· मिरज-बेळगाव · मिरज-लोंढा · मिरज-कॅसलरॉक

· मिरज-हुबळी · मिरज-लोंढा · कोल्हापूर-पुणे · कोल्हापूर-सातारा