अहो आश्‍चर्यम...! "आम्हीच पुन्हा येऊ' म्हणत, "या' महापालिकेची सभा तहकूब 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

महापौर व सभागृह नेता दोघांचेही समाधान 
सभा घ्यायची ही महापौर शोभा बनशेट्टी यांची, तर तहकूब करायची ही सभागृहनेता श्रीनिवास करली यांची भूमिका होती. त्यामुळे सभा काही वेळ चालवून महापौरांनी स्वतःचे आणि करली यांच्या सूचनेनंतर लगेच सभा तहकूब करून सभागृह नेत्यांचेही समाधान केले, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली. 

सोलापूर ः पार्टी मिटिंग न झाल्याने महापालिकेची सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधारी भाजपवर आली. विषयांवर चर्चा करून मग पार्टी मिटिंगचे कारण देत अशा पद्धतीने सभा तहकूब करण्याची ही पहिलीच वेळ होती. महापौर शोभा बनशेट्टी सभेच्या अध्यक्षस्थानी होती. महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीनंतर आम्हीच सत्तेवर येणार आहे, त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये असा चिमटाही सत्ताधारी पक्षाने विरोधकांना काढला. 

महापालिकेची सभा घ्यायची की नाही यावरून गेल्या शनिवारी (ता.16) झालेल्या पार्टी मिटिंगमध्येच वाद झाला होता. पुरवणीवरील विषयपत्रिका वेळेत मिळाल्या नसल्याने त्याचा अभ्यास झाला नाही, त्यामुळे सभा तहकूब करण्यात येईल, असा निर्णय सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी जाहीर केला होता. तर, विषय महत्त्वाचे असल्याने कोणत्याही स्थितीत सभा होणारच असे महापौर बनशेट्टी यांनी ठामपणे सांगितले होते. त्यामुळे आजच्या सभेत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

नियोजनानुसार ही सभा दुपारी चार वाजता होणे अपेक्षित होते. मात्र ती सायंकाळी पाच वाजता सुरु झाली. सभेच्या सुरवातीलाच शहरातील ड्रेनेज योजना आणि डेंग्युचे रुग्ण यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरवात केली. त्याचवेळी कॉंग्रेसचे विनोद भोसले यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत सलग तीनवेळा विक्रमी मतांनी विजय मिळवल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा तातडीचा प्रस्ताव मांडला. त्यात महापौरांनी दुरुस्ती सुचविता, प्रणिती यांच्यासह आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांचाही समावेश करावा, अशी सूचना केली व तो प्रस्ताव दाखल करून घेतला. 

महाराष्ट्र रातील ड्रेनेज योजना आणि डेंगीचे रुग्ण यावरून बहुतांश नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, गुरुशांत धुत्तरगांवकर, राजकुमार हंचाटे, रियाज खरादी, फिरदोस पटेल, सुनीता रोटे, किसन जाधव, यू. एन. बेरिया यांनी या संदर्भातील प्रश्‍न उपस्थित केले. ड्रेनेजचे नकाशेच तयार नसताना 180 कोटींचे काम मंजूर कसे केले, मक्तेदाराचे बिल देऊ नका, ड्रेनेजचे काम चार दिवसांत संपविण्यात आले आहे, कामाचा दर्जा निकृष्ट आहे हे मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले. या विषयावर आता सभागृहात गोंधळ होण्याची चिन्हे दिसताच, महापौरांनी सभागृहनेते करली यांचे म्हणणे ऐका, असे सांगितले. त्यावेळी श्री. करली यांनी पार्टी मिटिंग न झाल्याने सभा तहकूब करावी, अशी सूचना केली. त्यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महापौर सभागृहाबाहेर निघून गेल्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my surprise ...! "We will come again," said withdrawal meeting of this municipality