अरे वा.. तर सोलापुरात होऊ शकतो महाशिवआघाडीचा महापौर 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र राज्यात सत्ता आणण्यासाठी महाशिव आघाडी एकत्रित आली तर त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही होतील. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हा इतर पक्षांनी ठाम निर्णय घेतला तर सर्वाधिक नगरसेवक असतानाही भाजप व्यतिरिक्त आघाडीचा सोलापुरात महापौर होऊ शकतो. 

सोलापूर ः सोलापूरचे  महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा स्वप्नभंग झाला आहे. सलग तीन वेळेला महिलांना संधी मिळाल्याने 
यंदा महापौरपद खुले होईल, या अपेक्षेने आरक्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. आता राज्यात सत्ता आणण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना प्रयत्नशील आहे. ही आघाडी झाली तर त्याचे परिणाम महापालिकेत होऊन स्थानिक पातळीवर आघाडी होऊ शकते.

 

महाशिवआघाडी जिल्हाचे राजकारण बिघाडी

 

सध्या महापालिकेत 49 जागांसह भाजप सर्वाधिक नगरसेवक असलेला पक्ष आहे. त्या खालोखाल शिवसेना 21, कॉंग्रेस 14, एमआयएम आठ, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार, वंचित बहुजन ाघाडी तीन, बसप एक आणि माकप एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेसह इतर सर्व पक्ष एकत्रित आले तर त्यांचे संख्याबळ 52 होते, जे भाजपपेक्षा तीनने जास्त आहे. या प्रवर्गासाठी आरक्षित जागेवरून शिवसेनेकडून ज्योती खटके, सारिका पिसे, सावित्रा सामल, कॉंग्रेसमधून अनुराधा काटकर, एमआयएममधील शहाजीदाबानो शेख या नगरसेविका निवडून आल्या आहेत. महाशिवआघाडी झाली तर महापौरपदासाठी या सर्व नगरसेविका दावेदार असणार आहेत.

सोलापूर महापालिकेत चौथ्यांदा सलग महिलाराज

 

भाजपमध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. श्रीकांचना यन्नम व राजेश्री कणके या प्रमुख दावेदार असल्या तरी इतर नगरसेविकांनीही आपल्या गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी निश्‍चित करताना भाजपच्या नेत्यांची अडचण होणार आहे. विद्यमान महापौर शोभा बनशेट्टी या आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थक आहेत. त्यांना सव्वा वर्षे आणि यन्नम यांना सव्वा वर्षे महापौरपद असे नियोजन असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात तसे झालेच नाही. बनशेट्टी याच अडीच वर्षे महापौर राहिल्या, इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीमुळे सुमारे तीन महिन्यांची मुदतवाढ त्यांना मिळाली. या पार्श्वभूमीवर याच पद्धतीने दोन महापौर करायचे असतील तर आता प्रत्येकी साडेबारा महिन्यांचा करावा लागणार आहे. तथापि अंतर्गत मतभेदामुळे महापौरपदाची खुर्ची भाजपच्या हातून निसटणार नाही याची काळजी भाजपच्या श्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh wow .. Solapur may be the first mayor of Mahashivaaghadi