वृद्ध बापाचा चुलत्याच्या मदतीने मुलाने केला गळा दाबून खून 

वृद्ध बापाचा चुलत्याच्या मदतीने मुलाने केला गळा दाबून खून 

कोल्हापूर - उपचारासाठी दवाखान्यात असणाऱ्या वृद्ध बापाचा मुलाने चुलत्या मदतीने गळा दाबून खून केल्याचा प्रकार करवीर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पाच महिन्यापूर्वी येथील सीपीआरमध्ये हा प्रकार घडला होता. नामदेव पांडुरंग भास्कर (वय 63, रा. कुडीत्रे, ता. करवीर) असे मृतांचे नाव आहे. गुन्हा लपविण्यासाठी मुलगा व चुलत्याने डॉक्‍टरांनीच उपचारात हलगर्जीपणा केल्याचा कांगावा केला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर हाती आलेल्या धागेदोऱ्याच्या आधारे पाच महिन्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले.

याप्रकरणी संशयित मुलास अटक करण्यात आली आहे. गिरीश नामदेव भास्कर (वय 32, रा. कुडीत्रे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित तुकाराम पांडुरंग भास्कर (वय 53) याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. 

कुडीत्रे (ता. करवीर) येथे भास्कर यांचे एकत्र कुुटंब आहे. नामदेव पांडुरंग भास्कर हे गेल्या काही महिन्यापासून आजारी होते. त्यांच्या पायाच्या जांगेत गाठ झाली होती. त्यांचा लहान भाऊ संशयित तुकाराम भास्कर हा शिक्षक आहे. मुलगा संशयित गिरीष हा एका सिरॅमिक्‍स दुकानात काम करतो. गाठीचा त्रास जाणवू लागल्याने नामदेव भास्कर यांना 17 मे 2019 ला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर सीपीआरमधील दुधगंगा इमारतीतील पुरुष विभाग युनिट क्रमांक एकमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांचा 21 मे रोजी सकाळी मृत्यू झाला. याला डॉक्‍टरांचाच हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा कांगावा गिरीष व तुकाराम या दोघांनी नातेवाईक, मित्रपरिवार जमवून गेला होता. यानंतर मृतदेहावर सीपीआरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. पण डॉक्‍टरांनी व्हिरेसा राखून ठेवला होता. घटने दिवशी मृत नामदेव भास्कर यांच्या नाकातील कापूस तसेच त्यांना लावलेले सलाईन काढून टाकण्यात आल्याचे पाहून पोलिसांना शंका आली. मात्र करवीर पोलिसात अकस्मिक मृत्यू अशी प्राथमिक नोंद करण्यात आली होती. यानंतर याचा तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. हा तपास पोलिस निरीक्षक पाटील यांनी हा तपास उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्याकडे सोपवला. 

मृत्यू नैसर्गिक नसल्याचा अहवाल... 

मृत नामदेव भास्कर यांच्या मृतदेहावर केलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल करवीर पोलिसांना 30 सप्टेंबरला प्राप्त झाला. यात मृतदेहाच्या गळ्याभोवती जखमा, अंतर्गत जखमा असून गळा तोंड दाबल्याने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही असे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. रुग्ण व नातेवाईकांची गर्दी असताना त्यांचा घातपात झाला असावा या दृष्टीने उपअधीक्षक डॉ. अमृतकर व निरीक्षक पाटील यांनी सुरू केला. 

डॉक्‍टरांच्या शंकेने तपासाला गती... 

सीपीआरमध्ये नामदेव भास्कर यांच्या सेवेसाठी 21 मे रोजी रात्री त्यांचा मुलगा गिरीष व भाऊ तुकाराम हे दोघे थांबले होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास त्या दोघांनी त्यांना अंघोळ घातली. यानंतर डॉक्‍टरांकडून तासाभराच्या अंतराने त्यांची तपासणी केली जात होती. त्यांना चारच्या सुमारास सलाईनही लावले होते. मात्र पावणे सातच्या सुमारास अचानक त्रास जाणवू लागल्याचे गिरीष व तुकाराम या दोघांनी डॉक्‍टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात सलाईन काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते त्यांनी त्यांना पुन्हा लावले. त्यानंतर त्याची तपासणी केली. त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्याची तयारीसाठी डॉक्‍टर तेथून निघून गेले. अवघ्या दहा ते पंधरा मिनीटात पुन्हा डॉक्‍टर तेथे आले. त्यावेळी त्यांना भास्कर यांचे सलाईन पुन्हा काढलेले असून ते निचपित पडल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. पहाटे चारपर्यंत प्रकृती ठिक असताना घडलेल्या या घटनेबाबत डॉक्‍टरांनी पोलिसांकडे शंका व्यक्त केली. हिच शंका पोलिसांच्या तपासाला गती देणारी ठरल्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. 

सीसी टीव्हीत खूनाचा प्रकार कैद 
सीपीआरमधील सीसी टीव्हीत खूनाचा प्रकार कैद झाला आहे. मुलगा गिरीशनेच वडीलांचे तोंड व गळा टॉवेलने दाबला त्यावेळी त्यांचे पाय चुलता तुकारामने दाबून धरल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

कारण अस्पष्ट... 
प्रथमदर्शी नामदेव भास्कर यांचा खून त्यांच्या आजारपणाच्या दुखण्याला वैतागून मुलाने चुलत्या मदतीने केला असावा असा संशय पोलिसांना आहे. मात्र अद्याप याबाबतचे खरे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com