फेसबुकवर जुन्या फोटोंचा पाऊस.. कमेंटमध्ये उखाण्यांचा धुरळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020

21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे घरात कैद झालेल्या तरुणाईने स्वतःच्या फोटोंचा जुना खजिना उघडा केला आहे. दहा, पंधरा, वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या फोटोंचा फेसबुकवर अक्षरशः पाऊस पडतोय.

सांगली : 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे घरात कैद झालेल्या तरुणाईने स्वतःच्या फोटोंचा जुना खजिना उघडा केला आहे. दहा, पंधरा, वीस वर्षांपूर्वीच्या जुन्या फोटोंचा फेसबुकवर अक्षरशः पाऊस पडतोय. त्या फोटोला सरळ आणि साधी कमेंट देतील ते युजर्स कसले? अशा फोटोंसाठी खास उखाण्यामध्ये प्रतिक्रिया देण्याचा धुरळा उडाला आहे. एकापेक्षा एक भन्नाट उखाणे या निमित्ताने सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. 

फेसबुकवर सध्या कोरोना विषाणूबद्दलची माहिती शेअर करण्याच्या बरोबरीनेच जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फेसबुकवर याआधी अपलोड केलेल्या फोटोंसह घराच्या तिजोरीत पडलेल्या अल्बममधून फोटो काढून ते शेअर केले जात आहेत. अगदी काही चेहरे ओळखू येऊ नयेत इतके जुने फोटो एफबी फ्रेंड सर्कलला पाहायला मिळत आहेत. 

त्या फोटो पेक्षा जास्त चर्चा होते ती त्यावरील प्रतिक्रियांची. कारण या प्रतिक्रिया साध्या-सरळ आणि सोप्या भाषेत नाहीतच मुळी. अशा फोटोंवर थेट उखाण्यांच्या भाषेत प्रतिक्रिया देण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. सहाजिकच शोधून-शोधून उखाण्यांचा धुरळा उडाला आहे. या निमित्ताने काही नवकवींच्या प्रतिभेला उमाळाही फुटलेला पहायला मिळतो आहे. ज्याला निर्मिती जमत नाही तो कॉपी-पेस्ट करून आपली हौस भागवत आहे. असेच काही भन्नाट उखाणे ः 

सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा... 
आपल्या कोवळ्या कबीर सिंगने केला लाखो मुलींच्या मनावर कब्जा 

पाळण्यात बसून घेत होतो झोका.. 
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 

अरे भाजीत भाजी मेथीची..... 
हीच ती पहिली चॉईस होती कबीर सिंग मधल्या प्रीतीची...... 

10 किलो खवा त्यात 4 किलो रवा. 
चायनाच्या पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा.. 

हिरवगार जंगल... झुळ झुळ वाहतो झरा... भाऊ चा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा 

चेहरा तुझा चिकना, गोड तुझी वाणी 
भाऊला बघून पोरी म्हणतात... तू माझा बाजीराव, मी तुझी मस्तानी 

पोज देऊन भाई दिसतो देव जणू स्वर्गात..... 
भाईना बघून पोरी म्हणतात "मी का न्हवते लहानपापासून याच्या वर्गात" 

सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने ओढतात गाल, 
भाऊ पोरींना बघून म्हणतो 
"गाडी वाला आया घर से कचरा निकाल"... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old photos on Facebook... rhymes comments