सांगलीत "बेड' न मिळाल्यामुळे वृद्धेने गाडीतच सोडला प्राण...नातवाची रात्रभर बेडसाठी फरफट  

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 9 September 2020

सांगली-  कोरोना बाधित रूग्णांना "बेड' मिळत नसल्यामुळे फरफट होत असून सांगली-मिरजेतील अनेक हॉस्पिटलचा दरवाजा ठोठवावा लागत आहे. अनेकांना लवकर "बेड' मिळत नसून ताटकळत बसावे लागत आहे. आतापर्यंत काही रूग्णांना उशिराने उपचार मिळाल्यामुळे प्राण गमवावे लागलेत. आज पहाटे देखील मिरज तालुक्‍यातील बेडग येथील 80 वर्षीय वृद्धेला गाडीतच प्राण सोडावे लागले. काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत वणवण फिरणाऱ्या नातवाला आजीसाठी "बेड' च मिळाला नाही. एकुलता एक आधार असलेली आजी उपचाराअभावी गेल्यामुळे नातवाने "सोशल मिडिया' तून संताप व्यक्त केला. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून जिल्ह्यात ठिकठिकाणी 30 व 50 बेडस्‌ची हॉस्पिटल्स, केअर सेंटर उभी राहत आहेत. मात्र रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्यात "बेड देता का बेड' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण कक्षातूनही बेडस्‌ बाबत ठोस माहिती मिळत नाही. त्यामुळे रूग्णाला घेऊन नातेवाईकांना हॉस्पिटल्सचा दरवाजा ठोठवावा लागत आहे. 

मिरज तालुक्‍यातील बेडग येथील एका नातवाला आजीसाठी अशीच फरफट करावी लागली. आई-वडील नसलेल्या नातवासाठी आजीच आधार होती. 80 वर्षीय आजी तशी ठणठणीतच होती. परंतू प्रकृती बिघडल्यामुळे मोटारीतून सांगलीत उपचारास आणले. कोरोनाच्या संशयाने महापालिकेच्या आदिसागर कोविड सेंटरमध्ये मंगळवारी रात्री 9 वाजता आणले. तपासणीत अहवाल पॉझिटीव्ह आला. परंतू ऑक्‍सिजन पातळी कमी होऊ लागल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने ऑक्‍सिजन बेड असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला गेला. नातवाने आजीला घेऊन सांगली व मिरज परिसरातील हॉस्पिटल्सचा दरवाजा ठोठावला. परंतू बेड शिल्लक नसल्याचे प्रत्येक ठिकाणी सांगण्यात आले. नियंत्रण कक्षातही वारंवार विचारणा केली. रात्रीपासून पहाटे पाचपर्यंत नातवाला आजीसाठी बेड मिळाला नाही. बिचाऱ्या आजीने सकाळच्या वेळी कधीतरी झोपेतच प्राण सोडले. एकुलता आधार असलेली आजी उपचाराविना मृत झाल्याचे पाहून नातवाला संताप आला. अखेर त्याने "सोशल मिडिया' वरून संतापाला वाट मोकळी करून देत आरोग्य व्यवस्था कोरोना रूग्णांसाठी कुचकामी ठरल्याचे दाखवून दिले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The old woman died in the car as he could not get a bed