ऑनड्युटी "टिकटॉक' व्हिडिओ बनवणे आले अंगलट...तासगाव आगाराच्या महिला निरीक्षकांना केले निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

तासगाव (सांगली)- "कोरोना' आपत्तीच्या काळातही तासगावच्या एसटी आगारात ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर करून "टिकटॉक' व्हिडिओ बनवल्याचे महिला वाहतूक निरीक्षकाच्या अंगलट आले. निरीक्षक मीना पाटील यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी आज ही कारवाई केली. 

"लॉकडाउन' च्या काळात "टिकटॉक' वर व्हिडिओ बनवून टाकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. टिकटॉकवर व्हिडिओ बनवून टाकण्याचा मोह तासगाव एसटी आगारातील निरीक्षक मीना पाटील यांनाही आवरता आला नाही. त्यांनी चक्क कार्यालयात बसून बनवलेला व्हिडिओ "टिकटॉक' वर अपलोड केला आहे. तो सर्वत्र "व्हायरल' झाल्यानंतर तासगाव परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

निरीक्षक पाटील यांनी बनवलेला व्हिडिओ तासगावच्या आगारात खुर्चीवर बसून बनवलेला दिसतो. तीन व्हिडिओ व्हायरल झाले असून ते अनेकांच्या मोबाईलवर आहेत. व्हिडिओबद्दल त्यांना वैयक्तिक "लाईक्‍स' मिळत असल्यातरी ऑन ड्युटीवर "व्हिडिओ' बनवल्यामुळे जोरदार टिका होऊ लागली आहे. सध्या "कोरोना' मुळे एसटी च्या सर्वच आगारांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी तोट्यात धावत असताना दुसरीकडे निरीक्षक दर्जाच्या अधिकारी चक्क कार्यालयात टिकटॉक व्हिडिओ बनवून फॉरवर्ड करत आहेत. 

एसटीच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हनकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत निरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OnDuty "TickTock" video makers ST's female inspector suspended