कडकनाथ फसवणीबद्दल पद्माळेच्या एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सांगली- कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पातून कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणाऱ्या फुड बर्ड ऍग्रो प्रा. लि. या कंपनीचा सांगली शाखेचा शाखाधिकारी शौकत मिरासाहेब करीम (पद्माळे, ता. मिरज) याला आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश देण्यात आला.

कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पातून लाखो रूपये मिळवण्याचे आमिष दाखवून फुडबर्ड ऍग्रो प्रा. लि. या कंपनीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रूपये उकळले होते. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले. या कंपनीच्या जाळ्यात 145 हून अधिक लोकांनी पैसे गुंतवले. गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केल्यानंतर कंपनीने गाशा गुंडाळला होता. फुडबर्ड ऍग्रो प्रमाणेच इतर कंपन्यांनी देखील कडकनाथ कोंबडी पालनातून अनेकांची फसवणूक केली आहे. सद्यस्थितीत 145 लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

फुडबर्ड कंपनीतील फसवणुकप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे अन्वेषणने कंपनीतील पाच संचालकांना अटक केली आहे. मात्र कंपनीचे आर्थिक व्यवहार बघणारा शाखाधिकारी करीम हा पसार होता. त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. बारामती येथे गुन्ह्याचा तपास करताना करीमचा ठावठिकाणा समजला. त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अजित दळवी, उपनिरीक्षक सुनिल भिसे, कर्मचारी अमोल लोहार, दीपक रणखांबे, राणी गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested from Padmale for Kadaknath fraud