इस्लामपुरात सावकारीच्या त्रासातून एकाची आत्महत्या

धर्मवीर पाटील
Saturday, 19 September 2020

सावकारीच्या त्रासातून येथील प्रकाश साठे (रा. आदर्श शाळेच्या मागे, खांबे गल्ली, इस्लामपूर) यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

इस्लामपूर (जि . सांगली) : सावकारीच्या त्रासातून येथील प्रकाश साठे (रा. आदर्श शाळेच्या मागे, खांबे गल्ली, इस्लामपूर) यांनी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रवीण पाटील व महेश पाटील या दोन सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मृत प्रकाश यांची पत्नी मनिषा साठे यांनी याप्रकरणी आज इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : प्रकाश साठे हे केळी विक्रीचा व्यवसाय करत. लॉकडाऊनमुळे तो व्यवसाय बंद झाल्याने ते औद्योगिक वसाहतीत हमालकाम करत होते. प्रकाश यांनी व्यवसायासाठी महेश पाटील (इस्लामपूर) यांच्याकडून 10 हजार रुपये व्याजाने घेतले होते. मे 2020 पासून महेश पाटील व प्रवीण पाटील हे व्याजासह पैशांसाठी वारंवार फोन करून त्रास देत होते. लॉकडाऊनची अडचण सांगूनही ते ऐकत नव्हते; तर कामाच्या ठिकाणी जाऊनही ते पैशांची मागणी करत होते. 10 सप्टेंबरला महेश व प्रवीण हे घरी आले व घेतलेले 10 हजार व व्याजाच्या 60 हजारांची मागणी केली. नंतर देतो असे सांगूनही "येत्या चार दिवसात दिले नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही', अशी धमकी दिली. 

प्रकाश यांच्या पत्नी मनिषा शुभम बझारमध्ये काम करतात. 15 सप्टेंबरला पाचला त्यांना पती प्रकाश यांचा फोन आला. वाघवाडी फाट्यावर मालाची गाडी उतरण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी महेश व प्रवीण यांनी जाऊन पैशांची मागणी केली. त्यासाठी त्यांनी चार दिवसांची मुदत मागितली; परंतु तरीही त्या दोघांनी प्रकाश यांची दुचाकी मोटारसायकल (एमएच 10, डीबी 7175) जबरदस्तीने काढून घेतली. चार दिवसांत पैसे मिळाले नाही. तर जिवंत न ठेवण्याची धमकी दिल्याने मी घाबरून मुंडे (ता. कऱ्हाड, जिल्हा सातारा) येथे आलो असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले. गुरुवारी (ता. 17) पत्नी मनिषा व मुले माहेरी (साठेनगर, इस्लामपूर) येथे गेल्या होत्या.

जाताना प्रकाश यांनी "मी पैसे आणायला बाहेर जाणार आहे' असे सांगितले होते. 4 वाजता मनिषा यांनी मुलगा शुभम याला घरी पाठवून वडील आले आहेत का पाहण्यास पाठवले. प्रकाश हे आतून कडी लावून झोपल्याचे समजले. मनिषा यांनी जाऊन पाहिले तर आतून कडी होती. त्यांनी भाऊ अमोलला बोलावून घेतले. खिडकीची काच फोडून आत पाहिले, तर प्रकाश यांनी घराच्या लाकडी वाशाला साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसात महेश व प्रवीण पाटील विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यांना त्रास देऊ नका! 
मृत्यूपूर्वी प्रकाश यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, "देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. गुंडगिरीच्या जोरावर मला त्रास देणे सुरू आहे. खरा गुन्हेगार शोधा, माझी गाडी माझ्या घरी द्या. महेश पाटील व प्रवीण पाटील यांना त्रास देऊ नये, नंतर ते माझ्या घरच्यांना त्रास देतील...' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One commits suicide in Islampur due to harassment by money lenders