लॉकडाऊनमध्येही एक कोटीची घरपट्टी वसूल; नागरिकांनी स्वत:च बिले भरल्याने प्रशासनाचा ताण हलका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही महापालिकेच्या घरपट्‌टी विभागाची वसुली सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष वसुलीसाठी न जाताही नागरिकांनी स्वत:च घरपट्‌टी भरल्याने महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी रुपये जमा झालेत. 

सांगली : कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही महापालिकेच्या घरपट्‌टी विभागाची वसुली सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष वसुलीसाठी न जाताही नागरिकांनी स्वत:च घरपट्‌टी भरल्याने महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी रुपये जमा झालेत. 

कोरोनाच्या काळात गेली तीन महिने महापालिकेची कर वसुली बंद आहे. तसेच प्रशासनानेही घरपट्टी, पाणीपट्टीची बिले नागरीकांना दिली नाहीत. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे आहे. आयुक्तांनी कर भरण्यासाठी नागरिकांवर सक्ती करायची नाही, असे धोरण ठेवल्याने करांचे उत्पन्न ठप्प आहे. दुसऱ्या बाजूला महापालिकेचा महिन्यांचा खर्च 13 ते 14 कोटींच्या घरात जातो. शासनाकडून मिळणाऱ्या एलबीटीच्या अनुदानातून हा खर्च भागवण्यात येत आहे. 

या आर्थिक संकटाच्या काळात महापालिकेने 2020-21 सालातील नवीन बिलांचे वाटपही केलेले नाही. पण, नागरिकांनी ऑनलाईन बिलांच्या आधारे एप्रिल ते जूनअखेर स्वत:हून तब्बल एक कोटी रूपये घरपट्टी भरली आहे. एप्रिल महिन्यात 26 लाख 84 हजार 960 रूपये, मे महिन्यात 33 लाख 78 हजार 34 रूपये व जूनमध्ये 49 लाख 31 हजार 621 रूपये घरपट्टी जमा झाली आहे. 

कोरोनामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कर वसुली बंद करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मे महिन्यात महापालिकेने वसुली केलीच नाही. तरीही नागरिकांनीच बिले भरल्याने तिजोरीत एक कोटीची भर पडली. गतवर्षी या महिन्यात जमा झालेल्या वसुलीपेक्षा ही वसुली कमी असली तरी नागरिकांनी स्वत:च बिले दिल्याने प्रशासनाचा ताण हलका केला आहे. मार्च 2020 अखेर महपालिकेची घरपट्टी 37 कोटी 88 लाख 75 हजार 160 रूपये जमा झाली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरु झाल्याने पालिका प्रशासनाने वसुली थांबवली होती. मार्च अखेर घरपट्टी विभागाला 52 कोटी रूपये वसुलीचे टार्गेट होते. 

सहा महिन्याचे व्याज माफ होणार 

महापालिकेची घरपट्टी वार्षिक वसूल होते. तरीही बिलावर मात्र सहा-सहा महिन्याची घरपट्‌टी विभागून दिली जाते. एप्रिलमध्ये 2020-21 ची बिले वाटप होणे आवश्‍यक होते. मात्र कोरोनामुळे बिलांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे ही बिले आता पावसाळ्यानंतर वाटप होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सहा महिने विलंबाने बिले नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे वरील व्याज माफ होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore house tax recovered even in lockdown; The administration's stress is eased as the citizens pay their own bills