जिल्ह्याच्या एक चतुर्थांश या तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या; यामुळे फोफावतोय कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

आपल्या निष्काळजीपणाने आपण ज्येष्ठांना मरणाच्या दाढेत सोडून देत आहोत, याला जबाबदार कोण? 

बिळाशी (जि . सांगली) : राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वच यंत्रणांवरील ताण वाढत आहे; पण नागरिक मात्र निष्काळजीपणे बाहेर फिरताना आढळून येत आहेत. यामुळे आपल्याला व विशेषतः घरातील ज्येष्ठांना आपण कोरोनाचे रुग्ण बनवतोय हे त्यांना कळत नाही. कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या निष्काळजीपणाने आपण ज्येष्ठांना मरणाच्या दाढेत सोडून देत आहोत, याला जबाबदार कोण? 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने 519 चा आकडा पार केला आहे; तर तोच आकडा शिराळा तालुक्‍यात जवळपास 132 झाला आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात असणाऱ्या मणदूर गावात रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. ही वाढती संख्या नक्कीच चिंता वाढविणारी आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हजारो डॉक्‍टर्स, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, नातेवाईक स्वतःचा जीव धोक्‍यात घालून अहोरात्र झटत आहेत. महसूल, आरोग्य, पोलिस आदी विभागांतील अधिकारी, कर्मचारी जवळपास दोन-तीन महिने झाले आपल्या घरीच परतलेले नाहीत. हे सर्व ते कशासाठी करत आहेत, याचे कोणाला भानच दिसत नाही? 

आपण मात्र अत्यंत बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहोत. मास्क वापरणे असो, सोशल डिस्टन्सिंगचे पालन असो कीकि सॅनिटायझेशन... कोणतेही नियम आपण गांभीर्याने पाळत नाही. त्याचा सर्वांत पहिला फटका आपल्या कुटुंबालाच बसत आहे. जे ज्येष्ठ नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून घरातून बाहेरही पडले नाहीत, त्यांना कोरोनाग्रस्त बनवत आहोत. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण आपणच वाढवत आहोत. आपण आपल्याच लोकांच्या भोवती केवळ निष्काळजीपणाने मृत्यूची टांगती तलवार ठेवून फिरत आहोत, हे आपणास कळणार तरी कधी? 

घरात बसणे आता कोणालाही परवडणारे नाही. परंतु, बाहेर पडतानाची काळजी घेताना कोणी दिसत नाही. त्यामुळेच मग मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड, नियमांपेक्षा जादा लोक प्रवास, वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई असेल, उपाय करण्यास आपण प्रशासनाला भाग पाडत आहोत. 

कोरोनाची स्थिती 

  • जिल्ह्यातील संख्या : 519 
  • शिराळा तालुका : 132 
  • मणदूर गाव : 63 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One fourth of the district is the number of corona patients in Shiralala taluka