36 मंडलात होणार शंभर टक्के पंचनामे; पावसाच्या उघडीपीनंतरच संयुक्त पाहणी

विष्णू मोहिते
Friday, 16 October 2020

सांगली जिल्ह्यात बुधवार-गुरुवारी 24 तासांत वादळी पावसाने पार दाणादाण उडवली. जिल्ह्यातील दहापैकी जत व शिराळा तालुके वगळता अन्य आठ तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली.

सांगली ः जिल्ह्यात बुधवार-गुरुवारी 24 तासांत वादळी पावसाने पार दाणादाण उडवली. जिल्ह्यातील दहापैकी जत व शिराळा तालुके वगळता अन्य आठ तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. महसूल आणि सरकारी नियमाप्रमाणे पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी इंग्रज सरकारने लागू केलेल्या मंडलातील पावसाची मोजदाद आजही ग्राह धरली जाते. जिल्ह्यात 60 मंडल असून, त्यातील 36 मंडलात अतिवृष्टी झाल्याने संबंधित गावातील पंचनाम्यासाठी तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची नियुक्‍त्या केल्या आहेत. तिघाच्या स्वाक्षरीने पंचनामे होणार आहेत. पावसाच्या पूर्ण उघडीपीनंतरच पंचनामे सुरू होतील. 

जिल्ह्यात ऊस, मक्का, केळी, डाळिंब, द्राक्ष, उडीद, भुईमूग, सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले आहे. आज पावसाने उघडीप दिली आहे. शेतकऱ्यांनी शिल्लक राहिलेले सोयाबीन, मक्का आणि भुईमुगाची काढणी, तोंडणी थांबवावी लागेल, अन्यथा पंचनामे करणारा बाबू झालेले नुकसान मान्य करेल का, या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच उत्तर सध्यातरी कोणताच अधिकारी देऊ शकत नाही. अधिकारी पीक काढावे आणि नको, हे स्पष्ट सांगू शकत नाहीत. यामुळे पंचनाम्याची वाट पाहिली, तर राहिलेली 25 टक्के पीकही वाया जाण्याची शक्‍यता आहे. ती अन्य काही पिकांबाबतही लागू आहे. 

तालुकानिहाय पाऊस 
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आजअखेर पडलेल्या पाऊस तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये असा- मिरज 97 (756.2), तासगाव 86.5 (682.4), कवठेमहांकाळ 90.6 (758.8), वाळवा-इस्लामपूर 96.7 (859.3), शिराळा 59.7 (1438.7), कडेगाव 69.4 (746.7), पलूस 130.2 (724), खानापूर-विटा 105.6 (987.8), आटपाडी 96.7 (951.9), जत 49.9 (531.1). 

पंचनाम्यासाठीचे नियम 

  • प्रत्यक्ष जागेवर जाऊनच पंचनामा करावा 
  • नुकसानग्रस्त शेतीचे मोबाईल ऍपवर जीपीएस अनेबल्ड फोटो 
  • नुकसान ठरवण्यासाठी 7-12 वर पिकांची नोंद, जबाबदार तलाठी 
  • पंचनाम्याप्रमाणे रेकॉर्डवर नोंदी आवश्‍यक 
  • कामात हयगय केल्यास होणार कारवाई 

उघडीपीनंतर तातडीने पंचनामे

अतिवृष्टीच्या गावातील पंचनाम्यासाठी सरकारचे स्थायी आदेश आहेत. सर्वच ठिकाणी पावसाच्या उघडीपीनंतर तातडीने पंचनामे सुरू केले जातील. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred percent panchnama will be held in 36 mandals; Joint inspection only after raining stops