थकीत मालमत्ता धारकांसाठी शंभर टक्के दंड माफी

बलराज पवार 
Tuesday, 23 February 2021

महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना सुरू केली असून या अंतर्गत शंभर टक्के दंड माफी केली जाणार आहे. ही योजना 31 मार्चपर्यंतच आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना सुरू केली असून या अंतर्गत शंभर टक्के दंड माफी केली जाणार आहे. ही योजना 31 मार्चपर्यंतच आहे. पुन्हा राबवण्यात येणार नाही. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

आयुक्त कापडणीस म्हणाले,""गेल्या दोन आर्थिक वर्षात महापूर आणि कोविड काळात नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर नागरिकांना भरता आले नाही. यामुळे नागरिकांच्या मालमत्ता करायच्या दंड शास्तीमध्ये वाढ होत गेली होती. 

महापालिकेने नागरिकांना कर भरण्यात सवलत मिळावी या उद्देशाने 2021 मध्ये अभय योजना लागू केली आहे. या योजनेत नागरिकांना मालमत्ता व अन्य कराच्या दंड शास्तीमध्ये 100 टक्के माफी दिली जाणार आहे. ही अभय योजना 31 मार्च पर्यंतच सुरू राहणार असून त्यानंतर ही योजना बंद केली जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापि आपले महापालिकेचे कर भरले नाहीत त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन दंडशास्ती माफी करून भरून सहकार्य करावे.

 31 मार्च नंतर जे नागरिक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता जप्ती, मालमत्तेला महापालिकेचे नाव लावणे यासह प्रसंगी मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी दंड शास्ती माफी घेऊन थकीत मालमत्ता कर वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred percent penalty waiver for overdue property holders