जिल्ह्यात तातडीने शंभर व्हेंटीलेटरची आवश्‍यकता...प्रा. शरद पाटील : प्रशासन ठप्प असल्यामुळे रूग्णांचा मृत्यू 

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 2 September 2020

सांगली-  जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी व्हेंटीलेटरची संख्या अपुरी असून त्यामुळे अनेक रूग्णांना उपचाराविना प्राण गमवावे लागत आहेत. रूग्णांची व्हेंटीलेटरसाठी एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे फरफट सुरू आहे. तर प्रशासन ठप्पच आहे. या परिस्थितीत सिव्हील आणि वॉन्लेस हॉस्पिटलची यंत्रणा अधिग्रहण करून शंभर व्हेंटीलेटरची सोय करावी अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

सांगली-  जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी व्हेंटीलेटरची संख्या अपुरी असून त्यामुळे अनेक रूग्णांना उपचाराविना प्राण गमवावे लागत आहेत. रूग्णांची व्हेंटीलेटरसाठी एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे फरफट सुरू आहे. तर प्रशासन ठप्पच आहे. या परिस्थितीत सिव्हील आणि वॉन्लेस हॉस्पिटलची यंत्रणा अधिग्रहण करून शंभर व्हेंटीलेटरची सोय करावी अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, ""देशात आणि राज्यात कोरोना बाधित रूग्ण आढळण्यास मार्च महिन्यात सुरवात झाली. त्याचवेळी सांगलीत देखील कोरोना बाधित रूग्ण आढळले. तसेच प्रसार व्हायला सुरवात झाली. 125 वर्षाची जिल्ह्याला वैद्यकीय सेवेची परंपरा आहे. वैद्यकीय पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. 125 वर्षापूर्वी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी वैद्यकीय सेवेचा पाया घातला होता. येथे देशातून आणि परदेशातून दुर्धर आजाराचे रूग्ण येऊन बरे व्हायचे. परंतू सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यास आणि उपचार करण्यात जिल्ह्याचे काम वैद्यकीय पंढरीला साजेशे राहिले नाही. ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. इथल्या राजकीय व प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य धोका ओळखून साथीचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुरूच ठेवली नाही.''

ते पुढे म्हणाले, ""महापालिका क्षेत्रात दोन सिव्हील हॉस्पिटल आणि वॉन्लेस हॉस्पिटल अशी सर्व रूग्णांना सामावून घेण्याची क्षमता असलेली रूग्णालये असताना दहा आणि पन्नास बेडस्‌ असलेली रूग्णालये किंवा मंगल कार्यालये कोरोना सेंटर सुरू करण्यात धन्यता मानली. त्यामुळेच खासगी रूग्णालयांनी संधीचा फायदा घेऊन रूग्णांची प्रचंड लूट सुरू केली आहे. व्हेंटीलेटची संख्या अपुरी असल्यामुळे जिल्ह्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. व्हेंटीलेटरसाठी रूग्णांची एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे फरफट सुरू असून त्यातच अनेकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन ठप्प आहे. वास्तविक सिव्हील आणि वॉन्लेस हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणा अधिग्रहण करून शंभर व्हेंटीलेटर बसवून रूग्णांची सोय करण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची संपूर्ण व्यवस्था उपचारासाठी वापरावी. अन्यथा रूग्ण रस्त्यावर येऊन उपचाराअभावी मृत्यूमुखी पडतील अशी भयानक परिस्थिती आहे.'' 
ऍड. के.डी. शिंदे, शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी यावेळी उपस्थित होते. 
 

खासदार-आमदार गायब- 
कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक झाला असताना जिल्ह्यातील आमदार कोठेच दिसत नाहीत. तसेच खासदार हे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत नसून केवळ तासगावपुरते राहिले आहेत. संभाव्य धोका ओळखून या सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रा. पाटील म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred ventilators urgently needed in the district : Pro Sharad Patil