esakal | दहा हजार महिलांमागे एक स्वच्छतागृह 
sakal

बोलून बातमी शोधा

 one women latrine for ten thousand women in miraj

जागतिक आरोग्य संघटना सांगते, की शहराच्या क्षेत्रात 100 महिलांमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असले पाहिजे. सांगली मनपा क्षेत्रात अवघे 27 महिला स्वच्छतागृह आहेत.

दहा हजार महिलांमागे एक स्वच्छतागृह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः जागतिक आरोग्य संघटना सांगते, की शहराच्या क्षेत्रात 100 महिलांमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असले पाहिजे. आपण जगाचे निकष पाळतच नाही, मात्र किमान त्याच्या जवळपास तरी आकडे असावेत. धक्कादायक माहिती अशी, की मनपा क्षेत्रात अवघे 27 महिला स्वच्छतागृह आहेत. दोन वर्षांपूर्वी ही संख्या अवघी 3 होती, पैकी दोन बंद होते. आता न्यायालयाचा दंडुका टाळण्यासाठी 27 युनिट झालेत, मात्र त्यातील निम्मेही वापरात नाहीत.

कर्नाटक राज्यात महामार्गावर आणि शहरांमध्येही महिला स्वच्छतागृहाबाबत अतिशय जागरूकता आहे. आपण सीमा भागात आहोत, इथली अवस्था अत्यंत बिकट आहे. सांगली शहरात महिलांसाठी केवळ 3 स्वच्छतागृह होती. त्यावेळी अनेक महिलांना पोटाचे विकार झाल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर सांगली सुधार समितीने या विषयावर आंदोलन केले. विद्या बाळ यांनी "मिळून साऱ्याजणी' संस्थेतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या खटल्यात सांगलीसाठी ऍड. अमित शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र घातले. त्यानंतर सोळा ठिकाणी स्वच्छता गृह बसवले गेले. आता ते 27 ठिकाणी बसवले आहेत.

त्यातील अनेक युनिट चुकीच्या ठिकाणी बसवले गेले आहेत. तेथे लोकांची खूप वर्दळ असते. काही ठिकाणी टपोरीगिरी सुरू असते. अशा ठिकाणी महिला स्वच्छतागृहाचा वापर कसा करतील, यावरही प्रश्‍न उपस्थित केला गेला. याबाबत मनपा फारशी गंभीर नसल्याने त्यावर काम झाले नाही. काही स्वच्छतागृहांत पाण्याची टाकी नाही. काही ठिकाणी टाकी आहे तर पाणी नाही. सह्याद्रीनगर येथील स्वच्छतागृह वापरातच नाही, असे नागरिकांनी सांगितले. 

दुसरीकडे हॉटेल आणि काही सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे सर्वांसाठी खुली असली पाहिजेत, असे आदेश आहे. त्याबाबतच्या सूचना लिहिणारा फलक असणे आवश्‍यक आहे. तो कुठल्याही ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे महिलांची मोठी अडचण होते. 

समिती कुठे आहे? 
उच्च न्यायालयाने नगरसेवक, आयुक्त आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांची समिती बनवा, असे आदेश दिले होते. त्याबाबत महापालिका फार गंभीर नाही. दोन वर्षांपूर्वी एक समिती स्थापन केली, मात्र काम प्रभावी झाली नाही. गेल्या दीड वर्षात काय काम झाले, काय आढावा घेतला का? याची माहिती नाही. सध्या येथे बसवलेले मॉडेल चांगल्या दर्जाचे आहे, मात्र ते उपयोगात आले पाहिजेत. आठवडा बाजारांमध्ये प्रामुख्याने बसवणे गरजेचे आहे. मध्यंतरी कुलपे घातली होती. ती तोडून आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी आजही कुलूपबंद अवस्था आहे.