अरेच्चा ! बेळगाव बाजारपेठेत कांदा दरात घट; कसे काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

दोन महिन्यांपासून कांद्याचा दर उच्चांक गाठत आहे. मात्र, शनिवारी पहिल्यांदाच दरात घसरण पाहायला मिळाली. बुधवारी (ता. 4) घाऊक बाजारपेठेत कांद्याचा दर प्रतिक्‍विंटल 13 ते 15 हजार रुपये झाला होता. किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो 130 ते 165 रुपयांनी विकला जात होता.

बेळगाव -  येथील बाजारपेठेत इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. त्यातच एपीएमसीत तीन दिवसांच्या तुलनेत स्थानिक आवक वाढल्याने कांद्याच्या दरात प्रतिक्‍विंटल दोन हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे, तीन दिवसांपूर्वी प्रतिक्‍विंटल 13 ते 15 हजार रुपयांवर पोचलेला दर 11 ते 13 हजारांवर आला. त्यामुळे, किरकोळ बाजारातही कांद्याचा दर आकारानुसार प्रतिकिलो 100 ते 150 रुपये झाला आहे. इजिप्तमधून 90 हून अधिक पिशव्यांची आवक झाली आहे. 

दोन महिन्यांपासून कांद्याचा दर उच्चांक गाठत आहे. मात्र, शनिवारी पहिल्यांदाच दरात घसरण पाहायला मिळाली. बुधवारी (ता. 4) घाऊक बाजारपेठेत कांद्याचा दर प्रतिक्‍विंटल 13 ते 15 हजार रुपये झाला होता. किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो 130 ते 165 रुपयांनी विकला जात होता. त्यामुळे, सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले होते. चिकनपेक्षाही कांद्याचा दर अधिक झाला होता. त्यामुळे, हॉटेलमध्ये कांद्याऐवजी कोबीचा वापर वाढला आहे. मात्र, तीनच दिवसांनी शनिवारी आवक वाढल्याने दरात प्रतिक्‍विंटल दोन हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे, ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हे दोन मंत्री समन्वय ठेवणार 

इजिप्तहून 90 पिशव्यांची आवक

महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. यंदा महाराष्ट्रातच सर्वाधिक पाऊस झाल्याने उत्पादनात घट होऊन दर वाढले आहेत. नवा कांदा हळूहळू बाजारात येत आहे. त्यामुळे आवक अंशत: वाढली आहे. त्यातच केंद्र सरकारने इजिप्त व तुर्कस्थानातून कांद्याची आयात केल्याने परिस्थिती आटोक्‍यात येत आहे. शनिवारी बेळगाव एपीएमसीत इजिप्तहून आलेल्या 90 पिशव्यांची आवक दाखल झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल 12 हजार रुपये दर मिळाला. स्थानिक कांद्याला प्रतिक्विंटल 11 ते 13 हजार रुपये दर मिळाला. 

हेही वाचा - शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांची ही विनंती 

ग्राहकांना प्रतीक्षा दर उतरण्याची 

मध्यम आकाराच्या कांद्याचा किरकोळ विक्री दरातही घट झाली असून प्रतिकिलो 100 ते 130 रुपयांनी विकला जात आहे. मात्र, मोठ्या आकाराच्या कांद्याचा किरकोळ दर 140 ते 150 रुपये आहे. दरात घट झालेली असली तरी कांदा अजूनही सामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच आहे. त्यामुळे, कांदा खरेदीवर परिणाम झाला आहे. दरात आणखी घट होण्याची प्रतीक्षा ग्राहक करत आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Imported From Egypt Available In Belgaum Market