शिरगावच्या एकाला ऑनलाईन 85 हजारांचा गंडा 

महादेव अहिर 
Friday, 24 July 2020

वाळवा (सांगली)-  गुगल पे अकौंट व्हेरीफाय करायचे आहे, असे सांगत अनोळखीने शिरगाव (ता. वाळवा) येथील एकाला आज तब्बल 85 हजार रुपयांना चुना लावला. हातोहात एवढी मोठी रक्कम खात्यातून गायब झाल्याचा संदेश मोबाईलवर पाहताच त्या तरुणाच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने थेट सांगली येथील सायबर क्राईम विभाग गाठला. विजय विलास पाटील असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय पाटील याला आज सकाळी एकाचा फोन आला. समोरची व्यक्ती मराठीत बोलत होती. विजयला तुमचे गुगल पे अकौंट व्हेरीफाय करायचे आहे, पासवर्ड सांगा असे तो म्हणाला. त्याच्या संवाद शैलीने विजय गोंधळला आणि त्याने पासवर्ड दिला. तोच विजयच्या खात्यातून 19 हजार पाचशे रुपये काढले गेल्याचा संदेश मोबाईलवर आला. त्यानंतर पुन्हा समोरच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आणखी माहिती घेतली.

दरम्यानच्या काळात वजा झालेले 19 हजार पाचशे रुपये पुन्हा विजयच्या खात्यात जमा झाले. त्यावर विश्‍वास ठेवत विजयने समोरच्या व्यक्तीला सगळी गोपनीय माहिती दिली आणि फोन बंद झाला. काही मिनिटात विजयच्या मोबाईलवर गुगल अकौंटवरून 85 हजार रुपये काढले गेल्याचा संदेश आला. तसा विजय हबकलाच. त्याने समोरच्या व्यक्तीला फोन केला; मात्र त्या व्यक्तीने उचलला नाही. नंतर फोन स्विच ऑफ झाला. फसवणूक झाल्याचे समजताच भांबावलेल्या विजयने थेट सांगली येथील सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली आहे. गतवर्षी आलेल्या महापुराने विजयच्या घराची पडझड झाली होती. त्यासाठी शासनाने त्याला 95 हजार रुपये मदत दिली होती. ते पैसे अज्ञाताने ऑनलाईन पद्धतीने लुबाडल्याने विजयचे कुटुंब कोलमडले आहे. कष्टकरी कुटुंबाची अशा पद्धतीने फसवणूक झाल्यामुळे शिरगावात हळहळ व्यक्त होत आहे.  

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online fraud of one of Shirgaon