
यंदा गणित आणि इंग्रजी या दोन विषयांनी 70 टक्के मुले कच्ची असल्याचे समोर आले आहे. आता या विषयांचे नव्याने अध्यापन आणि उजळणी करवून घेणे हाच पर्याय आता शिक्षकांसमोर आहे.
सांगली ः कोरोनाच्या आपत्तीकाळात ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसून प्रयत्न केले. आता पाचवीपासून वर्ग सुरू झाल्यावर मुलांना "कळलं किती' असा कळीचा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात चर्चेत आला आहे. आधीच उल्हास, त्यात "कोरोना'चा दुष्काळ त्यामुळं यंदा गणित आणि इंग्रजी या दोन विषयांनी 70 टक्के मुले कच्ची असल्याचे समोर आले आहे. आता या विषयांचे नव्याने अध्यापन आणि उजळणी करवून घेणे हाच पर्याय आता शिक्षकांसमोर आहे.
कोरोना टाळेबंदी लागू होण्याआधीच जिल्ह्यातील प्राथमिक शाळा 16 मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत सहभागी विद्यार्थी संचाच्या नोंदीनुसार टेलीव्हिजन, रेडिओ, संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन आदींच्या माध्यमातून तीन लाख 47 हजार 380, ऑफलाईन माध्यमातून एक लाख 46 हजार 743 आणि या दोन्ही प्रक्रियेत नसलेले सहा हजार 440 विद्यार्थी आहेत. पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही माहिती आहे.
अर्थात शिक्षकांनी, संस्थांनी कळविलेली ही सारी आकडेवारी आहे. कुटुंबाचे अर्थकारण, प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध मोबाईल, इंटरनेट सेवा अशा अनेक अडचणी विचारात घेता खूप मोठी विद्यार्थीसंख्या ऑनलाईन-ऑफलाईन अध्यापन प्रक्रियेच्या बाहेरच असू शकेल. प्रत्यक्षात शिक्षण प्रक्रियेतून बाहेर पडलेले विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा नेमका किती उपयोग झाला याबाबत अभ्यास अहवाल पुढे आला नाही.
मात्र, आता गेला आठवडाभर पाचवीनंतरच्या शाळा 50 टक्के विद्यार्थीसंख्येच्या उपस्थितीत सुरू झाल्यावर कोण किती पाण्यात आहे, याचा अंदाज प्रथमच शिक्षकांना येतो आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले संगणक व मोबाईल वापराबाबत धीट झाली. झूम, गुगल मीटसारख्या ऍपचा वापर खेडोपाड्यातील मुलांकडून सराईतपणे झाला. मात्र, मुलं या वर्षात काय शिकली या प्रश्नाचं उत्तर अधिक महत्त्वाचं आहे. त्या पातळीवर मात्र शिक्षकांसमोर मुलांना पुढच्या वर्गात कसं ढकलायचं, याचं मोठं आव्हान आहे.
काही दिवस यंदाच्या अभ्यासक्रमातील उजळणीसाठी
मुलं नेमकी कोणत्या टप्प्यावर आहेत, हे पाहून पुढचे घटक घ्या अशा सूचना काही शाळांना भेटी दिल्या असता आम्ही केल्या आहेत. शासनाकडून स्पष्ट सूचना नाहीत. मात्र, पुढच्या सत्राआधी सुटीचा कालावधी कमी करून किंवा जून-जुलैमधील काही दिवस यंदाच्या अभ्यासक्रमातील उजळणीसाठी द्यावे लागतील, असे दिसते.
- नामदेव माळी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
मुलांचे गट करून त्यांची उजळणी
गणित आणि इंग्रजीबाबत मुलांना खूप अडचणी आहेत. आठवडाभरात लक्षात आलेली बाब म्हणजे अशिक्षित कुटुंबातील मुलांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. सध्या आम्ही पहिल्या घटकापासून तयारी करून घेत आहोत. मध्यम मुलं वाचन-लेखनात मागे पडली आहेत. त्यासाठी उमज पाहून मुलांचे गट करून त्यांची उजळणी करून घेत आहोत.
- चंद्रकांत कांबळे, प्राथमिक शिक्षक
फेरउजळणी करूनच पुढे जावे लागेल
जवळपास 20 ते 30 टक्के मुले खूपच मागे पडल्याचे सध्याचे चित्र आहे. गेला आठवडाभर शिक्षक मुलांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याला मर्यादा आहेत. पालकांनीही विशेष लक्ष द्यायला हवे. पुढील शैक्षणिक सत्रात जादाचा वेळ देऊन मुलांना पुढच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अशा घटकांची फेरउजळणी करूनच पुढे जावे लागेल.
- स्वप्नाली आवटी, प्राथमिक शिक्षक
पुढील शैक्षणिक सत्रासाठीही स्वतंत्रपणे नियोजन
ऑनलाईन शिक्षण म्हणजे "आनंद'च आहे. शासन निर्णयाची वाट न पाहता आम्ही सर्व इयत्तांसाठी प्रश्नवेध संच दिले आहेत. मुलांनी ते घरी बसून स्वतंत्र वहीत सोडवावेत. प्रश्नाचे उत्तर कोणत्या धड्यात आहे, हेही सोबत दिले आहे. हेतू हा की धड्याचे वाचन व्हावे. लेखन-वाचन या प्रक्रिया घडाव्यात. पुढील शैक्षणिक सत्रासाठीही आम्ही स्वतंत्रपणे नियोजन करून मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
- जनार्दन लिमये, उपाध्यक्ष, सांगली शिक्षण संस्था
संपादन : युवराज यादव