.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष! 

परशुराम कोकणे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

सोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर लोकवस्तीमध्ये दिसून येत आहे. कोणतेही वन्यजीव लोकवस्तीमध्ये दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाला कळवावे. वन्यजीव आपल्याकडे येत नाही तर आपण त्यांच्या आधीवासात जात आहोत हे समजून घेतल्यास मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष टाळता येऊ शकेल, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

आंतरराष्ट्रीय माकड दिनाच्या निमित्ताने सकाळने वन्यजीव आणि मानवी संघर्ष याअनुषंगाने आढावा घेतला आहे‌. एखादे माकड किंवा वन्यजीव लोकवस्तीमध्ये दिसून आल्यानंतर त्याच्याविषयीची उत्सुकता, आकर्षण लोकांमध्ये दिसून येते. अनेकजण माकडाला खायला देतात. काहीजण तर माकडाची हनुमान म्हणून पूजाही करतात. माणसाळलेल्या माकडाची काहीजण खोड काढतात, गंमत म्हणून त्याला दारूही प्यायला दिली जाते, असे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. माकड किंवा अन्य वन्यप्राणी लोकवस्तीत आल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचे खाद्य खायला द्यावे देऊ नये. वन्य प्राण्यांना त्यांचे अन्न नैसर्गिक पद्धतीने शोधू द्यावे. लोकवस्तीमध्ये आलेले माकड हुसकावून सुद्धा परत गेले नाही तर त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावला जातो. ते पिंजऱ्यात आले नाही तर भुलीचे इंजेक्‍शन देऊन ताब्यात घेतले जाते. वन विभाग किंवा प्राणिसंग्रहालयात काही दिवस उपचारानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. 

सोलापूर परिसरात माकडांसोबतच काळवीट, मोर, रानडुकरं आणि आता तर बिबट्यासारखे प्राणीही दिसून येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि पंढरपूर तालुक्‍यांत बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. वन विभागाचे पथक बिबट्या आणि मानवातील संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

हे लक्षात असूद्या.. 
- माकड किंवा अन्य वन्यप्राण्याला खायला देऊ नये. 
- पाण्याच्या शोधात ते लोकवस्तीत येतात. 
- शहरात सहज खायला मिळाले तर ते परत जात नाही. 
- वन्यप्राण्यांना मारहाण न करता वन विभागाला कळवावे. 
- वन्यप्राण्यांसोबत सेल्फी, फोटो काढू नये. 

वन्यजीव आपल्याकडे येत नाही तर आपण त्यांच्या आधीवासात जात आहोत, हे आधी नागरिकांनी लक्षात घ्यावे. वन्यजीवांचा अधिवास संपत असल्याने लोकवस्तीमध्ये त्यांचा वापर वाढत आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी प्रबोधनाची आवश्‍यकता आहे. कोणत्याही प्रकारचा वन्यप्राणी आढळून आल्यास तत्काळ वनविभागाला 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
- चेतन नलावडे, वनपाल, वनविभाग, सोलापूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only then end the conflict between human being and animals