Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात भाजपच्या वाट्याला दोनच जागा?

Vidhan Sabha 2019 : कोल्हापुरात भाजपच्या वाट्याला दोनच जागा?

कोल्हापूर - भाजपसोबत युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून, थेट उमेदवाऱ्या जाहीर केल्या. यात कोल्हापूर जिल्ह्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला कोल्हापुरात दोनच जागा आल्याचे मानले जात आहे. 

कोल्हापुरातील सहा विद्यमान आमदारांसह आठ जणांची उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली आहे. यात सत्यजित पाटील (शाहूवाडी) उल्हास पाटील (शिरोळ), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) प्रकाश आबिटकर (भुदरगड-राधानगरी), डॉ. सुजित मिणचेकर (हातकणंगले), चंद्रदीप नरके (करवीर) या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. यासह संजयबाबा घाटगे (कागल) आणि संग्रामसिंह कुपेकर (चंदगड) यांनाही शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. भाजपसाठी इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण या दोनच जागा वाट्याला आल्या आहेत. इचलकंरजीत सुरेश हाळवणकर आणि दक्षिणमध्ये अमल महाडिक विद्यमान आमदार आहेत. भाजपने कागलसह चंदगड आणि कोल्हापूर उत्तर या जागांसाठी आग्रह धरला होता. युती झाल्यास कोल्हापुरातील जागांची आदलाबदल होणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून, मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे दोन खासदार त्यामुळेच या जागा सेना सोडेल, हे  शक्य नव्हते. 

कागलचे काय? 
कागलच्या जागेसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आग्रही होते. महाजनादेश यात्रेतही मुख्यमंत्र्यांनी भाजप नेते आणि शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगेच कागलचे पुढचे आमदार असतील, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. पण, शिवसेना या जागेसाठी ठाम राहिल्याने समरजीत घाटगेंच्या उमेदवारीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. येत्या दोन दिवसांत युती तुटली तर, समरजीत कागलमध्ये भाजपचे उमेदवार असतील, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणे हा त्यांच्यापुढील दुसरा पर्याय असेल.  

शिवसेनेचा बालेकिल्ला 
कोल्हापूरने २०१४ मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेला मोठं यश मिळवून दिलं. दहा पैकी सहा ठिकाणी शिवसेना विजयी झाली. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या रुपाने कोल्हापुरात शिवसेनेचे दोन खासदार पहिल्यांदाच निवडून आले. दोन खासदार निवडून आल्याने शिवसेना कोल्हापुरातील कोणतीही जागा सोडण्यास तयार नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com