अकरा वर्षे उपेक्षित राहिलेल्या वीरमातेच्या न्यायाचा मार्ग खुला 

शिवकुमार पाटील 
Saturday, 19 September 2020

सहनशिलतेचा अंत झाल्यानंतर अखेरीस पालकमंत्री जयंतराव पाटील हे 8 ऑगष्ट रोजी गाव भेटीसाठी आले असता श्रीमती राजाक्का पाटील यांनी आपली व्यथा कानावर घातली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घरी येवून वीरमातेच्या समस्या जाणून घेवू लागले आहेत. 

 

किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) ः गेली अकरा वर्षे शासनदरबारी दुर्लक्षित गेल्याने किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील शहिद प्रशांत पाटील यांच्या मातोश्री वीरमाता राजाक्का जोतीराम पाटील यांना शहिदांच्या वारसांना अनुज्ञेय असणाऱ्या योजनेतून अर्थसहाय्य मिळण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता तसेच सातत्याने पाठपूरावा करुनही शासन निर्णयाप्रमाणे देय असलेल्या जमीन मागणीचा प्रस्ताव महसूल दरबारी धुळ खात पडून होता.

वर्षानुवर्षे खेटे घालूनही कुणी दाद देत नव्हते. सहनशिलतेचा अंत झाल्यानंतर अखेरीस पालकमंत्री जयंतराव पाटील हे 8 ऑगष्ट रोजी गाव भेटीसाठी आले असता श्रीमती राजाक्का पाटील यांनी आपली व्यथा कानावर घातली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घरी येवून वीरमातेच्या समस्या जाणून घेवू लागले आहेत. 

शहिद प्रशांत पाटील पाटील हे केंद्रीय पोलिस दलात सेवेत असताना 11 मे 2008 रोजी हजारीबाग (झारखंड) येथे माओवाद्याशी समोरासमोर झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. ते अविवाहीत असल्याने त्यांच्या पश्‍चात आईच त्यांच्या कायदेशीर वारस आहेत. त्यानुषंगाने वीमातेस मात्र गेली अकरा वर्षे शासकिय अनुदान आणि जमीन लाभाच्या प्रकरणी उपेक्षित रहावे लागते होते. सन 2014 साली जमीन मागणी प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी अशी शिफारस त्यावेळीही ग्रामविकास मंत्री असताना पाटील यांनी केली होती. तद्नंतर सरकार बदलले आणि कुणीच दखल न घेतल्याने जमीन मागणीचा प्रस्ताव ज्याप्रमाणे धुळ खात पडून राहिला त्याप्रमाणे अनुदान मागणीचा अर्जही बेदखल झाला होता. 

गतवर्षी राज्यात पून्हा सत्ता बदल होवून जयंतराव पाटील हे जलसंपदा मंत्रीपदाबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पाटील गावभेटीसाठी आले असता त्यांनी वीरमातेची व्यथा समजून घेतली. व्यथा कानी घातल्यानंतर अवघ्या एकाच महिन्यात अकरा वर्षे उपेक्षित राहिलेल्या वीरमातेस न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने जयंतराव पाटील यांची सामान्य जनतेच्या प्रश्नी असलेली तळमळ, कार्यतत्परता दिसून आली आहे. 

मुलगा शहिद झाल्यापासून अकरा वर्षात माझ्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी कुणीच फिरकले नाही. माझ्या समस्या जाणून घेतल्याने मला आता नक्की न्याय मिळेल असा विश्‍वास माझ्या मनी आला आहे. 
- वीरमाता राजाक्का पाटील 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open the way for the justice of the heroic mother who was neglected for eleven years