
होनगा, चन्नम्मानगरात कारवाई, धाब्याजवळच्या पानटपरीत विक्री
बेळगाव : होनगा येथील राजस्थान धाब्यानजीकच्या पानटपरीत आणि चन्नम्मानगर येथे अफिम या अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. गुरुवारी (ता.18) सायबर इकनॉमिक्स नार्कोटीक्स (सीईएन) पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 1 किलो 15 ग्रॅम वजनाचे अफिम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शुक्रवारी सीईएन पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. याप्रकरणी बसकतसाब विल्लाखान (वय 30, रा. वृत्ती पान शॉप राजस्थानधाबानजीक जोगानट्टी), कमलेश सुरजराम बेनीवाला (वय 25, रा. गोकुळनगर मोरारजीनगर हुबळी) आणि सरवन उर्फ सावराराम असुराम बिसनोई (वय 21, या. चन्नम्मानगर) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. होनगा गावातील पी. बी. रोडच्या बाजूला असलेल्या राजस्थान धाब्यातील पानटपरीत आणि चन्नम्मानगर येथे अफिमची ग्राहकांना विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती सीईएन पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून दोन्ही ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान वरील तिघांना अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून 1 किलो 15 ग्रॅमचे सुमारे 20 लाख रुपये किमतीचे अफिम जप्त करण्यात आले. तिघांनाही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या अफिमची अंदाजे किंमत 20 लाख रुपये होते. पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, चंद्रशेखर निलगार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. सीईएन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत बक्षीस घोषित केले आहे.
संपादन-अर्चना बनगे