लॉकडाऊन'ची संधी; सावकारांची चांदी 

अमोल गुरव 
शनिवार, 30 मे 2020

सांगली ः राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांपासून ते छोट्या विक्रेत्यांपर्यंत अनेक जण आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तावर आहेत या संधीचा फायदा उठवत सावकारी पुन्हा फोफावली आहे. दोन महिन्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून 6 जणांनी आत्महत्या केली आहे. मध्यंतरी विशेषत: पोलिसांनी मिरज तालुक्‍यात सावकारांवरील कारवाईचा धडाका लावून अनेकांच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. पण आता लॉकडाऊनमुळे गरजूंचा फायदा उठवत पुन्हा सावकारी फोफावत असल्याचे चित्र आहे. 

सांगली ः राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांपासून ते छोट्या विक्रेत्यांपर्यंत अनेक जण आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तावर आहेत या संधीचा फायदा उठवत सावकारी पुन्हा फोफावली आहे. दोन महिन्यात सावकाराच्या त्रासाला कंटाळून 6 जणांनी आत्महत्या केली आहे. मध्यंतरी विशेषत: पोलिसांनी मिरज तालुक्‍यात सावकारांवरील कारवाईचा धडाका लावून अनेकांच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. पण आता लॉकडाऊनमुळे गरजूंचा फायदा उठवत पुन्हा सावकारी फोफावत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचे संकट जगभर थैमान घालत असून महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. या काळात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले. शेतकरी, शेतीमाल उद्योग, छोटेमोठे उद्योग, हातगाडेवाले, टपरीवाले यांच्यासह व्यावसायिकांना मोठा फटका बसला. काहींचे तर पोट भरणेही मुश्‍कील झाले. दोन महिन्यातच अनेकजण घाईला आले. यातून संसाराचा गाडा ओढण्यासाठी शेतकऱ्यासह मध्यमवर्गीयांना सावकाराच्या दारात जावे लागले.

पठाणी पद्धतीचा व्याजदर लावून सावकारांनी लूट सुरू केली असल्याच्या अनेक तक्रारी वाढत आहे. जिल्ह्यातील मिरज, कडेगाव, पलूस, जत, वाळवा खानापूर तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात सावकारांचे जाळे तयार झाले आहे. सावकारांनी लॉकडाऊनचा फायदा घेत भरमसाट व्याज लावत कर्जे वाटप केली आहेत. या व्याजापोटी मिरज, जत, पलूस, वाळवा तालुक्‍यातील सहा शेतकऱ्यांनी सावकाराला कंटाळून आत्महत्या केली. 
जिल्ह्यातील सधन तालुके समजले जाणारे पलूस, कडेगाव, वाळवा, मिरज, तासगाव तालुक्‍यांत बेकायदा सावकारी चांगलीच फोफावली आहे. अनेकजण सावकारांच्या पाशात अडकले आहेत. या सधन तालुक्‍यातील- सावकारांनी आता दुष्काळी तालुक्‍यात पाय रोवले आहेत. आटपाडी, जत कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यात आपले एजंट नेमून बेकायदा सावकारी सुरू केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये पंधरा टक्के व्याज- 
मार्च महिन्यापासून सर्वत्र लाकडाऊन सुरू आहे. अनेक कामगारांना हाताला काम नाही. घराचा गाडा चालवण्यासाठी शेतकऱ्यांसह अनेकांनी सावकारांकडून कर्ज उचलले आहे. अडचणीत सापडलेल्या कर्जदारांकडून हे सावकार अगदी पाच टक्केपासून ते पंधरा ते वीस टक्के मासिक व्याज सावकार वसुली करीत आहेत. 

येथे सावकारी जोमात- 
कडेगाव, पलूस, मिरज तालुक्‍यांतील अनेक गावांत सावकारी जोमात आहे. मिरज तालुक्‍यातील सोनी, मालगाव, कवलापूर, माधवनगर, पलूस तालुक्‍यातील बांबवडे, आंधळी, पलूस, कुंडल, बुर्ली, किर्लोस्करवाडी, भिलवडी आदी परिसरात तर कडेगाव तालुक्‍यात देवराष्ट्रे, वांगी, कडेगाव, तासगाव तालुक्‍यातील सावळज, मणेराजुरी, वायफळे, तासगाव, कवठेएकंद येथे सावकारी जोमात सुरू असल्याची चर्चा आहे. सावकारांच्या जाचाने कंटाळलेल्यांच्या संतप्त प्रतिक्रिया कानोकानी आहेत. 

वसुलीसाठी गुंडांचा वापर- 
सावकाराने त्रस्त झालेल्या काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर गुंडाकडून कसा वापर होतो आहे, याच्या अनेक व्यथा मांडल्या. गुंडांचा वापर आणि सावकारांची पठाणी वसुली, गुंडगिरी, शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, वसुलीसाठी घर, जमिनी जबरदस्तीने खरेदी करणे सुरू झाले आहे. वसुलीसाठी काहींना सळो की पळो करून सोडले आहे. सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस कोरोनाच्या कामात व्यस्त असताना हे सावकार वसुलीसाठी बळाचा वापर करत आहेत. 

हातगाडे नेले उचलूृन- 
सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर, कॉंग्रेस भवन, साखर कारखाना परिसर, आरटीओ ऑफिस, सांगली बसस्थान परिसराततील अनेक हातगाडे, पानटपऱ्या, यांना काही खासगी सावकार कर्जपुरवठा करून 10 टक्‍क्‍यांपर्यंत व्याजदर लावत आहेत. लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्याने अनेकांना व्याजाचे पैसे देता आले नसल्याने या सावकारांनी काही जणांचे हातगाडेही उचलून नेले असल्याचे पीडितांनी सांगितले. 

सावकारांना आवरा, आमदार खाडेंची मागणी 
मिरज शहर आणि प्रामुख्याने पूर्व भागातील गावागावांत खासगी सावकारी मटका आणि अन्य अवैध धंद्यांमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. सगळेच अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. अन्यथा, याचा जाब आपण थेट मुख्यमंत्र्यांना विचारू, असा इशारा आमदार सुरेश खाडे यांनी दिला. 

जिल्ह्यातील खासगी सावकारांवर दोन महिन्यांपूर्वी मोठी कारवाई केली आहे. मात्र अजून कोठे सावकारी होत असेल तर त्यांनी निसंकोचपणे पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल. 
मनीषा दुबुले 
अप्पर पोलिस अधीक्षक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity for lockdown; Lender's silver