
सांगली जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करण्याचा कानमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. राज्यातील सत्तेचा पुरेपूर उपयोग करून जिल्ह्यात पक्ष बांधणीची संधी आहे.
सांगली ः जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करण्याचा कानमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. राज्यातील सत्तेचा पुरेपूर उपयोग करून जिल्ह्यात पक्ष बांधणीची संधी आहे. मात्र त्यासाठी राज्य स्तरावरुन ताकद मिळण्याची जिल्ह्यातील नेत्यांची अपेक्षा आहे. ती आता पूर्ण होताना दिसते आहे. खासदार संजय पाटील समर्थकांना शिवबंधन बांधून लावलेली पक्षप्रवेशाच्या फटाक्यांची माळ दीर्घकाळ वाजत राहील, असा विश्वास येथील शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यात शिवसेनेचे एक आमदार, तीन जिल्हा परिषद सदस्य, एका पंचायत समितीवर सत्ता आणि इस्लामपूरचे काही नगरसेवक आहेत. आता राज्यात शिवेसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करण्याची मोठी संधी आहे. ती साधण्यासाठी जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी किती कष्ट उपसणार याकडे लक्ष असेल. काही नवे प्रवेशही झाल्यामुळे शिवसेना "ऍक्शन मोड' मध्ये असल्याचा एक सकारात्मक संदेश राजकीय क्षेत्रात आहे.
सांगलीत चांगली संधी असतानाही शिवसेनेने सांगलीकडे का दुर्लक्ष केले आहे, याचे उत्तर मिळत नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेला फारसा भाव दिला नाही, किंबहुना अडचणच केली, अशा तक्रारी जिल्हाप्रमुखांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यांनी यात लक्ष घालू, असे सांगितले. ते जयंतरावांशी कधी बोलणार आणि त्याचा परिणाम होणार का, याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे. कारण, भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेची नेमकी हीच अडचण झाली होती.
जिल्ह्यात पुढील दीड वर्षात महत्वाचे निवडणूक कार्यक्रम होतील. त्यात प्रमुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समिती, जिल्हा बॅंक या प्रमुख संस्थाचा समावेश आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणूका होत आहे. त्यात शिवसेनेला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज वाढवावी लागेल. राज्य सरकारच्या माध्यमातून छोटी-छोटी कामे मंजूर करून आणावी लागतील.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर शिवसैनिक रिचार्ज होतील, अशी आशा आहे. त्यांनी शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर नेतृत्वासाठी साथ देण्याची ग्वाही दिली. महापालिकेतील प्रश्नांवर जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर यांनी काढलेला मोर्चा लक्षवेधी ठरला. शहरातील नागरी समस्यांसह विकास मुद्यांवर शिवसेना आक्रमक होण्याची गरज आहे.
मशागत तर करावीच लागेल
निवडणुका लगेच नाहीत, मात्र आतापासून मशागत करावी लागणार आहे. गेल्या निवडणूकीत 51 जागा स्वबळावर लढवल्या होत्या. त्यात यश मिळाले नाही.
संपादन : युवराज यादव