नवीन वर्षात उत्कृष्ट भाषण करणाऱ्या युवा वर्गाला हेलीकॉप्टरमधून बेळगाव दर्शनाची संधी 

विशाल जाधव
Wednesday, 6 January 2021

आमदार जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील युवा वर्गाला नेहमीच प्रेरणास्थान ठरले आहेत.

बेळगाव :  देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यावर निबंध लेखन आणि उत्कृष्ण भाषण करणाऱ्या पहिल्या दहा युवा वर्गाला हेलीकॉप्टरमधून बेळगाव दर्शनाची संधी मिळणार आहे. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार सतिश जारकीहोळी यांनी नवीन वर्षात ही नवी संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मानव बंधूत्व मंचच्या माध्यमातून राज्य पातळीवर सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारीत निबंध आणि भाषण स्पर्धा आयोजित केली असून त्यातील दहा विद्यार्थ्यांना हेलीकॉप्टरचा प्रवास घडणार आहे.

आमदार जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्यातील युवा वर्गाला नेहमीच प्रेरणास्थान ठरले आहेत. जिल्ह्यातील युवक आणि युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सतिश शुगर्स व मानव बंधूत्व मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सतिश शुर्गसच्या माध्यमातून शालेय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शरिरसौष्ठव स्पर्धा भरविणे, युवा गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संगीत स्पर्धा कार्यक्रम ते घेत आले आहेत. आता राष्ट्रीय पुरुषांच्या विचारसरणी आणि त्यांच्या इतिहासाची जाण युवा वर्गाला व्हावी. या उद्देशाने त्यांनी मानव बंधूत्व मंचच्या माध्यमातून राज्य पातळीवरील निबंध आणि भाषण स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यातील विविध तालुक्‍यांमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. यातील दहा विजेत्यांना आता पुरस्कारासह हेलीकॉप्टरचा प्रवास घडणार आहे.

10 जानेवारी रोजी राज्य पातळीवर दहा जणांची निवड केली जाणार असून त्यांना गोकाक येथे बोलाविले जाणार आहे. महर्षी वाल्मीकी मैदानावरून हेलीकॉप्टर दहा विद्यार्थ्यांसमवेत आकाशात भरारी घेणार असून बेळगावातील निवडक प्रेक्षणीय स्थळांचे हवाई निरीक्षण करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. मानव बंधूत्व वेदीकेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनावर देखिल आमदार जारकीहोळी यांनी भर दिला असून दरवर्षी स्मशानभूमीत ते कार्यक्रम आयोजित करतात. त्यांचे स्वतःचे हेलीकॉप्टर असून त्याचा वापर आता ते या संकल्पनेसाठी करीत आहेत. आपल्या नवनव्या संकल्पातून त्यांनी आजवर युवा वर्गासाठी अनेक उपक्रम राबविले असून आता त्यात राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी नव्या संकल्पनेची भर पडली आहे.

जारकीहोळी यांनी नववर्षात सावित्रीबाई फुले यांच्या इतिहासावर राज्य पातळीवरील स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्यांनी त्यापाठोपाठ अशा राष्ट्रपुरुषांच्या इतिहासावर आधारीत स्पर्धा आणखी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील स्पर्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारीत असून ती देखिल राज्य पातळीवर घेतली जाणार आहे. तर त्यापाठोपाठ बसवेश्‍वरांच्या जीवनावर आधारीत निबंध आणि भाषण स्पर्धा घेण्याची घोषणा केली आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity to visit Belgaum by helicopter to the youth giving excellent speeches in the New Year