
मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलला ऑक्सिजन प्रकल्पासाठी जागा भाड्याने देण्यास भाजप सदस्यांनी विरोध केला.
सांगली : मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलला ऑक्सिजन प्रकल्पासाठी जागा भाड्याने देण्यास भाजप सदस्यांनी विरोध केला. उपसूचनेद्वारे थेट नावावर जागा दिलेले ठराव विखंडित करुन यापुढे ऐनवेळी उपसूचना घेऊ नयेत. त्याऐवजी अजेंड्यासोबत द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महापालिकेची उद्या (ता. 17) महासभा ऑनलाईन होणार आहे. सिनर्जी हॉस्पिटलला शेजारच्याच महापालिकेच्या जागेत ऑक्सिजन प्रकल्पासाठी जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव सभेत आला आहे. 21 गुंठे जागा अवघ्या 2 लाख 23 हजारात 11 महिन्यांसाठी भाड्याने देण्यात येणार आहे. त्याला भाजप सदस्यांनी विरोध केला. प्रशासन सदस्यांना गृहीत धरुन प्रस्ताव आणत आहेत का? असा सवाल करीत कुणाच्या परवानगीने प्रकल्प उभारला ? असाही प्रश्न उपस्थित झाला. दंड आकारण्याची मागणी केली. कुपवाडमधील शाळा आणि क्रीडांगणाच्या जागेवरील आरक्षण उठवण्यासही विरोध करण्यात आला. तेथे जेवढ्या जागेत सध्या घरे बांधली आहेत. तेवढ्याच जागेचे आरक्षण उठवण्यास सदस्यांनी तयारी दर्शवली.
मार्च महिन्यातील महासभेत बंद जकात नाक्याच्या जागा उपसूचनांद्वारे थेट नावावर भाड्याने देण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे सत्ताधारी म्हणून भाजपची बदनामी होत असल्याने महासभेत उपसूचनाच घेऊ नयेत, अशी मागणी केली. या विषयावरुनही भाजप सदस्य आक्रमक झाले. अशा प्रकारामुळे पक्ष बदनाम होत असल्याची भूमिका बैठकीत मांडली. त्यानंतर उपसूचना महासभेत न घेण्याचे ठरले.
पुढची महासभा सभागृहात घ्या
महासभा ऑनलाईन घेण्यावरुन सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा परिषदेची सभा, विधीमंडळ अधिवेशन सभागृहात होत असताना महासभा ऑनलाईन का घेतली ? असा जाब नगरसचिवांना विचारण्यात आला. उद्याची सभा तहकूब करा अशी मागणीही केली. नगरसचिवांनी शासनाकडून ऑफलाईन सभा घेण्याचे पत्र आले नसल्याचे सांगितले. यावर महासभा सभागृहातच झाली पाहिजे, असे सदस्यांनी सुनावले.
सभागृहात दिवे कशाला पाहिजेत?
मिरजेच्या एका सदस्याने वॉर्डात दिवे नाहीत. सभागृहात कशाला पाहिजेत ? असे म्हणत थेट सभागृहातील दिवेच बंद करुन टाकले. प्रशासन वॉर्डात दिवे लावत नाही. निम्म्याहून अधिक शहरात दिवे नाहीत. दिवे बसवण्यास परवानगी नाही. त्याचा संताप त्यांनी कृतीतून व्यक्त केला.
विरोधकांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी
भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी, कुपवाडमधील शाळा आणि क्रीडांगणाचे आरक्षण उठवण्याबाबत विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे दिसते. त्यांच्यातच गट पडले आहेत. दोन्ही गट त्यांची भूमिका वैयक्तिक भेटून सांगत आहेत. विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
संपादन : युवराज यादव