esakal | सांगलीतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला हा पर्याय

बोलून बातमी शोधा

This option was given to the administration by the traders of Sangli....

गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. याचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली.

सांगलीतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला हा पर्याय
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : शासनाने दुकाने सुरु करण्याबाबत दिलेल्या आदेशामुळे महापालिका क्षेत्रातील दुकाने सुरू करण्याबाबत व्यापाऱ्यांत संदिग्धता आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. याचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली. त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना तसे निवेदन पाठविले आहे.

श्री. शहा म्हणाले,"" "कोरोना' च्या पार्श्‍वभूमीवर शहरात राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून सहकार्याची भूमिका घेतली. सांगली ऑरेंज झोनमध्ये आल्याने आता काहीबाबतीत शिथिलता देताना एकाकी आस्थापने व एकाच ओळीत असलेली पाच दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली.

मात्र काही दुकानेच सुरू राहिल्याने तेथे गर्दी होऊ शकते. व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासन, पोलिसांशी वारंवार चर्चा केली. स्थानिक प्रशासनाला येथील अडचणी माहिती असल्याने दुकाने सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासनाला देण्यात यावा. केवळ शहरांतर्गत व्यापार सुरू करावा.

महापालिकेच्या सीमा सील ठेवाव्यात. बाजारपेठेत सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करावीत. एक आड एक दुकान सुरू ठेवावे किंवा पाच दुकाने सुरू ठेवून त्यापुढील पाच दुकाने बंद ठेवावीत. जिल्ह्यातून ग्राहक सांगलीत येणार नाही याची दक्षता घ्यावी. चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी राहील. दुकानातील दोन कर्मचारी ग्राहकास सॅनिटायझर देऊनच आत सोडतील, अशा उपाययोजना केल्या तर शहरातील बाजारपेठा सुरू ठेवण्यास अडचण येणार नाही, असेही शहा म्हणाले.