
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या नवजात शिशु केअर युनिटमधील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
सांगली : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या नवजात शिशु केअर युनिटमधील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिका क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत. त्याचे अहवाल सादर न केल्यास रुग्णालयांचे ना हरकत परवाने रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला.
महापालिका क्षेत्रात तीनशे हॉस्पिटल आहेत. सर्व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा सुसज्ज आहे का? ती व्यवस्थित सुरू आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. यात त्रुटी आढळल्यास संबंधित रुग्णालयांना तत्काळ दुरुस्त करून घेण्याची सूचना देण्यात येणार आहे. फायर ऑडिटसंदर्भात नोटीस बजावूनही ज्यांनी अद्यापही फायर ऑडिट केले नाही, अशा रुग्णालयांविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याबरोबरच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. रुग्णालयांच्या इमारतीची स्थिती काय आहे हे समोर येणार आहे. या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल एक महिन्यात सादर करावे लागणार आहेत. फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट केले नसल्यास रुग्णालयांना महापालिकेने दिलेली एनओसी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टचा नूतनीकरण परवानाही मिळणार नाही, असे श्री. कापडणीस म्हणाले.
त्रुटी तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश
भंडाऱ्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे फायर आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णालय इमारतींची सद्य:स्थिती समोर येईल. ज्या त्रुटी असतील त्या तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश रुग्णालयांना दिले जातील. जे त्याची पूर्तता करणार नाहीत, त्यांच्या एनओसी रद्द केल्या जातील.
- नितीन कापडणीस, आयुक्त, महानगरपालिका
संपादन : युवराज यादव