सांगली स्टेशन चौकातील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; नगरविकासमंत्र्यांनी घेतली दखल

बलराज पवार
Saturday, 7 November 2020

सांगली महापालिकेच्या स्टेशन चौकातील मोक्‍याच्या कोट्यवधी किमतीच्या जागेचा बाजार करून ती व्यापारी संकुलासाठी बांधण्यास परवाना दिल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.

सांगली ः महापालिकेच्या स्टेशन चौकातील मोक्‍याच्या कोट्यवधी किमतीच्या जागेचा बाजार करून ती व्यापारी संकुलासाठी बांधण्यास परवाना दिल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. प्रधान सचिवांनी महापालिका आयुक्तांनाही चौकशीची सूचना केल्याची माहिती शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील यांनी सांगितली. 

अमोल पाटील म्हणाले की, रेल्वे प्रशासनाकडून विकत घेतलेल्या स्टेशन चौकातील महापालिकेच्या मालकीच्या सिटी सर्व्हे क्रमांक 341 मधील कोट्यवधींच्या भूखंडाचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून तत्कालिन सांगली नगरपालिकेने 1978 मध्ये ही जागा खरेदी केली होती. त्या जागेपैकी 30 हजार चौरस फूट जागेचा तडजोडीने बाजार झाला आहे.

कारभारी, प्रशासनाने संगनमताने हा बाजार केल्याचा आरोप होत आहे. शिवाय सर्व कायदे धाब्यावर बसवून याच जागेवर 85 हजार चौरस फूट व्यापारी संकुल उभे करण्यासाठी बांधकाम परवानाही दिला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. महापालिकेचा मध्यवर्ती ठिकाणचा आरक्षित भूखंड लाटण्याचे काम केले जात असल्याबद्दल जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी केली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम तसेच कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, स्टेशन चौकातील 30 हजार चौरस फूट जागेवर नगरविकास विभागाची बिनशेती करताना, 10 टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात देणे गरजेचे असताना महापालिका प्रशासनाने कोणतीही महसुली बाब तपासली नाही व बेकायदेशीरपणे 85 हजार चौरस फूट वाणिज्य बांधकाम करण्यास परवाना दिला आहे. यामध्ये महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तो व्यवहार व बांधकाम परवाना रद्दची मागणी केली आहे. 

अमोल पाटील म्हणाले की, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधान सचिवांनी आयुक्तांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत. 

संपादन :  युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order for inquiry into Sangli Station Chowk plot scam; The Urban Development Minister took notice