मोहोळ येथे सेंद्रिय शेती व शेतमाल निर्यात कार्यशाळा संपन्न

राजकुमार शाह
सोमवार, 23 जुलै 2018

पापरी तालुका मोहोळ येथे सेंद्रिय शेती व शेतमाल निर्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हांडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.

मोहोळ - 'निर्यातक्षम द्राक्ष व इतर फळांच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे. शासनाच्या निर्यातीच्या योजनांचा लाभ घ्या विषमुक्त अन्न उत्पादनाकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून शारीरिक रोग होणार नाहीत', असे प्रतिपादन पुणे येथील कृषी आयुक्तालयातील तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी केले.

पापरी तालुका मोहोळ येथे सेंद्रिय शेती व शेतमाल निर्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हांडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक येथील प्रगतशील शेतकरी विनोद लगड, कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस, आरसी इंडस्ट्रीचे संचालक धीरज कदम, समाधान भोसले, बाळासाहेब शेळके, अजित भोसले, बाबुराव भोसले, दादा पाटोळे, मधु गोडसे, विठ्ठल कारंडे, आबा शिंदे, रोहित इंगळे, सिद्धेश्वर माने, पप्पू श्रीखंडे आदी सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी महेश कडूस म्हणाले, शेतकऱ्यांनी बाहेर फिरून इतरांची शेती पाहून माहिती घेतली पाहिजे. कृषी पर्यटन व कृषी सहलीचे आयोजन केले पाहिजे. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विनोदी लगड म्हणाले, पिकाला रासायनिक खताची मात्रा कमी करून जमिनीचा कर्ब कसा चांगला ठेवता येईल. हे ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे सेंद्रिय खते व हिरवळीच्या खताची मात्रा दिली पाहिजे. शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढला तर पिकाची निरोगी व जोमदार वाढ होणार आहे. तर किडीचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी उत्पन्नात भर पडणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भोसले यांनी केले तर आभार समाधान भोसले यांनी मानले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Organic farming and commodities export workshop concluded at Mohol