अनाथ कार्तिकीला आज भेटणार नाथ...; न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार विवाह सोहळा

प्रमोद जेरे
Friday, 25 December 2020

डतर प्रवासानंतर उद्या (शुक्रवारी) कार्तिकी आता नव्या प्रवासाला निघणार आहे, या प्रवासात मात्र तिचा सोबती बरोबर असणार आहे. म्हणजे कार्तिकी विवाहबंधनात अडणार आहे.

मिरज (जि. सांगली) : खरंतर तिची कहाणीच अजबच... पंढरपूर येथे एका निर्जनस्थळी आठ महिन्यांची असताना तब्बल दोन दिवस मृत आईचे दूध पिताना ती आढळली... आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर ती पंढरपूरच्या रेणुका शिशुगृहात ती दाखल झाली. कार्तिकी वारीच्या गर्दीत ती मिळाल्याने तिचे नामकरण सहाजिकच कार्तिकी असे झाले.... 

नियमाप्रमाणे तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला. अस्तित्वात असूनही ते मिळणारच नव्हते, त्यामुळे ती अनाथ म्हणूनच वाढली. तिच्या अजाणतेपणी तिचा बदलीचा प्रवास सुरू झाला. वासुदेव बाबाजी नवरंगे या संस्थेत ती तीन वर्षाची होईपर्यंत राहिली. त्यानंतर तिला भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या 18 व्या वर्षानंतर मात्र या जगात तिचे कोणी नाही, हे मायबाप म्हणवून घेणाऱ्या सरकारी यंत्रणेला ज्ञात असूनही कार्तिकीला संस्थेमधून बाहेर पडावे लागले... 

ना घर, ना दार, ना आईबापाचा पत्ता... अशा सैरभैर अवस्थेत कार्तिकी जिथे आधार मिळेल तिथे राहिली. सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई माहिमकर यांनी तिला त्यांच्या जिजाऊ महिला आधार केंद्रात ठेवून घेतले. या संस्थेचे बेघर महिला निवारा केंद्र मिरजमध्ये सुरू झाल्यानंतर ती तेथे दाखल झाली. अनाथ महिलांची केअरटेकर बनली. गेल्या दीड वर्षांपासून ती या केंद्रांत काम करते आहे. 

अशा खडतर प्रवासानंतर उद्या (शुक्रवारी) कार्तिकी आता नव्या प्रवासाला निघणार आहे, या प्रवासात मात्र तिचा सोबती बरोबर असणार आहे. म्हणजे कार्तिकी विवाहबंधनात अडणार आहे. तिचा होणारा पती अजय वसंतराव डावके (रा. बुलढाणा) हा मुंबईमध्ये अशाच प्रकारे वृद्धांची सेवा करतो आहे.

हा विवाह सोहळा उद्या (ता. 25) रोजी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पार्वती सभागृहात सकाळी 11 वाजता सत्यशोधक पद्धतीने होणार आहे. त्याची सर्व जबाबदारी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील डॉ. विनोद परमशेट्टी आणि सुरेखा शेख यांनी घेतली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orphan Karthiki will tie knot today; The wedding will be held at the New English School