खंडणीखोर पोलिसांच्या रडारवर ; कऱ्हाड पोलिसांचा कारवाईसाठी आराखडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

कऱ्हाड शहरातील जनता, व्यापारी, कष्ट करून जगणाऱ्या कुटुंबांकडे जर कोणी हप्ते, खंडणी मागत असेल तर त्याची तक्रार द्यावी, संबंधितांची नावे गोपनीय ठेवून संबंधित खंडणीखोरांच्या मुसक्‍या आवळल्या जातील.
- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड.

कऱ्हाड ः व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांच्या कमाईवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून खंडणी, हप्ते गोळा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईसाठी आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत संबंधित खंडणीखोरांसह त्यांची "प्यादी' म्हणून काम करणाऱ्यांवरही पोलिसांचा "वॉच' असून, त्यांचीही आता या कारवाईतून सुटका होणार नाही. 

कऱ्हाड शहरातील गुंडगिरीवर मध्यंतरीच्या काळात अंकुशच न राहिल्याने गुंडांच्या टोळ्यांनी डोके वर काढले. त्यातून येथील बुधवार पेठेत पवन सोळवंडे या युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे कऱ्हाडची गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर आली. त्यामुळे शहराची पुन्हा राज्यभर चर्चा झाली. या गुंडांच्या टोळ्यांना रसद पुरवणारे, त्यांच्यासाठी प्यादी म्हणून काम करणारे, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, हातगाडे आणि अन्य व्यावसायिक आदींकडून हप्ते, खंडणी मागणाऱ्यांना "टार्गेट' करून आता पोलिसांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला आहे. 

याबाबत माहिती देताना पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव म्हणाले, ""पोलिस अभिलेखावरील गुंड, त्यांच्या छत्रछायेखाली सामान्य, व्यापाऱ्यांकडून खंडणी, हप्ते गोळा करणाऱ्या प्रत्येकाची यादी तयार करण्यात आली आहे. कऱ्हाड पोलिस उपविभागात युवराज साळवे, जुनेद शेख यांच्या टोळीवर "मोका'ची कार्यवाही केली आहे. येणाऱ्या काही दिवसांत आणखी दोन टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक गुंडावर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन तरुणांनी त्यांचा वापर जर कोणी हप्ते, खंडणी मागण्यासाठी, अवैध धंदे करण्यासाठी करत असेल तर वेळीच सावध होणे आवश्‍यक आहे. एकदा जर पोलिस कारवाईत ते तरुण अडकले तर आयुष्यभर त्यांना शासकीय नोकरी मिळणार नाही. त्यांचे रेकॉर्ड तयार झाल्यावर आयुष्य बरबाद होणार आहे. त्यासाठी पालकांनीही दक्ष राहावे.'' 

तरुणींनाही आवाहन 

महाविद्यालयीन परिसरात तरुण-तरुणींना कोणी त्रास देत असेल, टोळक्‍याने कोणी येऊन दमदाटी करत असेल, दादागिरी करून दहशत माजवत असतील, भांडणे-मारामाऱ्या करत असतील तर अशा टोळक्‍यांचे मोबाईलवर चित्रण करून, फोटो काढून ते पोलिसांना पाठवावे. पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्याची खातरजमा करून तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी तरुण-तरुणींनी माहिती देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही आवाहन पोलिस उपअधीक्षक श्री. गुरव यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outline from Karad police for action on gundas