
सांगली- तीन महिन्याचे थकीत वेतन आणि सण उचल, भत्ते मिळावेत या मागण्यासाठी एसटी कामगार संघटनेने आज कामगार भवन येथे निदर्शने केली. तसेच अनेकांनी कुटुंबियासमवेत राहते घरी आक्रोश आंदोलन केले. तसेच एसटी प्रशासनाने कायदा व कराराचा भंग केल्यामुळे औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
कोरोनाच्या संकटात एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. "बेस्ट' च्या मदतीसाठीही कर्मचारी जाऊन आले. मुंबई महापालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांना दहा हजार रूपये सानुग्रह अनुदान जाहीर केले. परंतू एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून तीन महिन्याचे वेतन दिले नाही. दिवाळीसारखा महत्वाचा सण तोंडावर आला असताना सण उचल दिली नाही. नियमित वेतन देणे बंधनकारक असताना त्याची अंमलबजावणी केली नाही. करारातील तरतुदीनुसार महागाई भत्ता व थकबाकी दिली नाही. डिसेंबर 2019 पासून वाढीव पाच टक्के महागाई भत्ता लागू नसून तो थकबाकीसह लागू केला नाही. त्यामुळे थकीत वेतन, सण उचल व महागाई भत्ता द्यावा या मागणीसाठी यापूर्वी निवेदन देऊन दखल घेतली नाही. प्रशासनासह जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही कार्यवाही केली नाही. त्यामुळे 9 रोजी आक्रोश आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
आज ड्युटीवर नसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह आक्रोश आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सांगलीत एसटी कामगार संघटनेच्या कामगार भवनसमोर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी जोरदार निदर्शने केली. संघटनेचे सचिव नारायण सूर्यवंशी म्हणाले, ""आज तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन केले जात असताना सुद्धा एसटी प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. जाणीवपूर्वक वेतन, भत्ते व सण उचल देण्यास टाळाटाळ करून कामगारांची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.''
संघटनेचे उपाध्यक्ष शमु मुल्ला, दिलीप चौगुले, दिलीप पाटील, शबनम नदाफ, अनिता लोंढे, अभिजीत राजपूत, धनंजय पाटील, मनोज पाटील आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.