esakal | परप्रांतीय परतले, भूमिपुत्रांना संधी; उद्योगांत भरतीचा धडाका, कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय परतले, भूमिपुत्रांना संधी; उद्योगांत भरतीचा धडाका, कुठे?

परराज्यातील सुमारे आठ हजार कामगारांनी सांगली जिल्हा सोडून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार गाठले आहे.  त्यांच्या जागी स्थानिक तरुणांना रोजगार देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

परप्रांतीय परतले, भूमिपुत्रांना संधी; उद्योगांत भरतीचा धडाका, कुठे?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : परराज्यातील सुमारे आठ हजार कामगारांनी सांगली जिल्हा सोडून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार गाठले आहे. ते कधी परत येतील माहिती नाही. त्यांच्या जागी स्थानिक तरुणांना रोजगार देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी कामगार भरती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 1200 हून अधिक कामगारांची भरती झाल्याचे उद्योजक सतीश मालू आणि भालचंद्र पाटील यांनी सांगितले.

पुणे, मुंबईतून गावी आलेल्या अनेक तरुणांनी आता परत महानगरांत न जाता येथेच नोकरी स्वीकारली आहे. तेथे त्यांनी 20 ते 25 हजार रुपये मासिक पगार होता. येथे त्यांनी 10 ते 12 हजार रुपये पगार दिला जात आहे. घरी राहून हा पगार परवडणारा आहे, येथे आधी नोकऱ्याच नव्हत्या म्हणून हे तरून तिकडे गेले होते, आता ते खूष आहेत, असे उद्योजकांनी सांगितले. 
कोरोना संकटातून मार्ग काढत उद्योग सुरू करण्यास अखेर मान्यता मिळाली. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 70 टक्के उद्योगांची धडधड सुरू झाली आहे. सांगली, मिरज, कुपवाड औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील सुमारे एक हजार 760 उद्योग सुरू करण्यात आलेत. जगभरातील निर्यात आता हळूहळू गती पकडत असल्याने पुढील पंधरा दिवसांत उद्योग पुन्हा सावरतील, असा विश्‍वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे. 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चनंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यात सर्वात मोठी हानी उद्योगांची झाली. सलग दोन महिने हे उद्योग बंद राहिले. जगभरातील व्यवहार ठप्प राहिल्याने आयात-निर्यातही थांबली. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील सर्वच उद्योगांवर झाला. सुमारे तीस हजारांहून अधिक कामगारांवर संकट आले. त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या 17 हजारांहून अधिक आहे. या संकटकाळात त्यांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पावले उचलली आणि कोरोना संपला तरी हे संकट कामगारांअभावी गडद होणार, अशी भीती दाटली. त्या साऱ्यातून मार्ग काढत आता इथले कारखाने सुरू करण्यात आले आहेत. संकट मोठे आहे, अडचणी असंख्य आहेत, आर्थिक ताण आहे, कामगारांचा तुटवडा आहे, कच्च्या मालासाठीचा संघर्ष आहे आणि तयार माल पुढे पाठवण्यासाठीही कसरत सुरू आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक उद्योगांत अन्न पदार्थाचे उत्पादन करणारे उद्योग, डेअरी, पशु, पोल्ट्रीखाद्य उद्योग, कोल्ड स्टोअरेज, वेअर हाऊस, कॉरोगेटेड बॉक्‍स 

उत्पादन, औषधे व वैद्यकीय साधने उत्पादन, इतर- पॅकिंगशी संबंधित उद्योग यांचा समावेश आहे. या सर्व उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्योगाचा परिसर सॉनिटायझेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

आकड्यांत स्थिती 

 • सुरू झालेले उद्योग ः 1 हजार 760 
 • कामगारांची उपस्थिती ः 22 हजार 36 
 • कुपवाड, मिरज, सांगलीस वसाहत ः 902 उद्योग 
 • तीन वसाहतीत कामगार ः 11 हजार 285 
 • परप्रांतात परतलेले कामगार ः सुमार 8 हजार 
 • * सुरू झालेले प्रमुख उद्योग ः फौंड्री, टेक्‍सटाईल, प्लास्टीक पाईप निर्मिती, बॉक्‍स निर्मिती, ऑईल मिल, डाळ मिल, हळद मिल 
 • * अडखळत असलेले उद्योग ः इलेक्‍ट्रॉनिक पार्ट निर्मिती, पॅनल बोर्ड निर्मिती, कॅपॅसिटर (कच्चा माल न मिळाल्याने) 

प्रमुख मागण्या अशा 

 • कर्जाच्या व्याजात माफी द्यावी 
 • किमान सहा महिन्यांची व्याजमाफी करावी 
 • वीज बिलात सवलत द्यावी 
 • लॉकडाऊन काळातील वीज स्थिर आकार रद्द करावा 

वीज बिलात, व्याजात सवलत द्या

उद्योग सुरू झाले आहेत. गती पकडायला काही काळ लागेल. आता निर्यातही सुरू झाली आहे. सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा नाहीत, मात्र वर्षानुवर्षे आम्ही कर भरत आलो आहोत. तर वीज बिलात, व्याजात सवलत मागितली आहे. ती मिळेल, अशी खात्री वाटते.

- सतीश मालू, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रिज अँड कॉमर्स