
मिरज : कोट्यवधीची थकबाकी, पाणी बिलांची अत्यल्प वसुली आणि देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च याचा मेळ बसत नसल्याने तालुक्यातील तानंग, सावळी पाणी पुरवठा योजनेस घरघर लागली आहे. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. योजना बंद झाल्यास किमान 50 हजारहून आधिक ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
सन 1998 मध्ये तानंग सावळी पाणी योजना या नावाने सुरू झालेल्या तत्कालीन योजनेत तानंग, सावळी, मानमोडी, कानडवाडी, कळंबी, वड्डी, ढवळी या सात गावांचा समावेश होता. नंतर या योजनेत सुभाषनगरचा समावेश करण्यात आला. कळंबी, ढवळी आणि मानमोडी या तीन गावांनी स्वतंत्ररीत्या पाणीपुरवठा योजना करून घेतल्यामुळे ही तीन गावे या योजनेतून बाहेर पडली.
सध्या वड्डी, तानंग, सावळी, कानडवाडी आणि सुभाषनगर या चार गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होतो. या चार गावांतून वर्षाकाठी केवळ 30 ते 35 लाख रुपयांची वसुली होते. वड्डी ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी भरून घेत असूनही पाण्याचे पैसे देत नसल्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची तक्रार आहे. योजनेचे पाणी वापरलेल्या आणि योजनेतून बाहेर पडलेल्या गावाकडील पाण्याची थकबाकीही मोठी आहे. अन्य गावांमधून होणारी वसुली ही अतिशय नगण्य आहे. साहजिकच थकबाकीचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. सध्या योजना चालवण्यासाठी प्रतिवर्षी किमान 1 कोटी 70 लाख रुपयांचा खर्च येतो. पुरेसे कर्मचारी नसल्याचे कारण सांगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी योजना कशीतरी ओढाताण करत चालवीत आहेत.
गावनिहाय थकबाकी :
वडड्डी-13 लाख 49 हजार 736
सावळी- 35 लाख 32 हजार 032
कानडवाडी- 11 लाख 20 हजार 545
सुभाषनगर- 7 लाख 37 हजार 839
ढवळी- 9 लाख 86 हजार 692
एकुण थकबाकी 76 लाख 55 हजार 808
योजनेचा वार्षिक खर्च
* कर्मचारी पगार- 1 कोटी 10 लाख
* वीज बिल- 35 लाख
* रॉ वॉटर चार्जेस- 3 लाख 55 हजार
* अन्य किरकोळ खर्च- 5 लाख
एकुण : 1 कोटी 53 लाख 55 हजार
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.