esakal | अमेरिकेनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकवर याचीच धुम; ओव्हर द टॉप

बोलून बातमी शोधा

अमेरिकेनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकवर याचीच धुम; ओव्हर द टॉप
अमेरिकेनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकवर याचीच धुम; ओव्हर द टॉप
sakal_logo
By
जयसिंग कुंभार,

सांगली : गेल्या दोन- तीन वर्षांत ओटीटी.... "ओव्हर द टॉप' या नव्या अदृश्‍य पडद्याने देशभरात धमाल उडवून दिली आहे. घरातल्या टीव्ही चॅनेल्सना आणि चित्रपटगृहांना एक तगडा स्पर्धक म्हणून ओटीटीची ऐंट्री झाली आहे. कोरोना टाळेबंदीने तर या नव्या स्पर्धकाला आधीच्या धावपटूंचे अडथळे दूर करून स्वतंत्र महामार्गच उपलब्ध करून दिला. चित्रपट, मालिका, संगीत, गाणी, नृत्य, क्रीडा असा मनोरंजनाचा खजिना बोटाच्या इशाऱ्यावर उपलब्ध करून देणाऱ्या या नवमाध्यमाने देशाला वेड लावले असून या व्यवसायाची भारतातील वाढ अमेरिकेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची आहे. या नवमाध्यमाच्या वाटचालीबद्दल...

ओटीटीची ओळख

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म म्हणजेच ओव्हर द टॉप. टीव्हीवरील चॅनेल्स बघण्यासाठी तुम्हाला डीश किंवा केबल जोडावी लागते. ओटीटीसाठी त्याची गरज नसते. पूर्ण इंटरनेटचा वापर करून हे चालवले जाते. मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरून ओटीटी वापरता येते. त्यासाठी विहित कालावधीसाठी नोंदणी करून वर्गणी द्यावी लागते. इंटरनेट असेल तर मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही या तिन्ही वर ओटीटी वापरता येते. मोबाईलवर वापरण्यासाठी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल. कॉम्प्युटरवर ओटीटी वापरण्यासाठी वेबसाईटचा आधार घ्यावा लागतो. तसेच टीव्ही वर ओटीटीचे अनेक ऍप्स आधीच जोडलेले असतात त्यावर जाऊन तुम्ही ओटीटीचा आनंद घेऊ शकता. मात्र त्यासाठी स्मार्ट टीव्ही हवा.

ओटीटी वर्तमान

भारतात गेल्या दोन-तीन वर्षांत नेटप्लिक्‍स धमाल केली आहे. टीव्ही आणि सिनेमाघरांचा तोच खरा स्पर्धक ठरला. त्यानंतर ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार, फायरस्टीक, जिओ सिनेमा असे कैक ओटीटी प्लॅटफॉर्म आता देशभर उपलब्ध आहेत. या क्षेत्रातले अनेक परदेशी बडे प्लेयर स्थानिक प्लॅटफॉर्मशी टायअप करून भारतीय बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. युजर्स आकर्षित करण्यासाठी नवनव्या स्कीम आणल्या जात आहेत. पहिले काही महिने फुकट ट्रायल देऊन नंतर तुम्हाला निरंतर सेवा मिळते. फुकट सेवा देणाऱ्या अनेक ओटीटी प्लॅटफॉमचीही संख्या मोठी आहे. गुगल केल्यास त्याची माहिती मिळते.

ओटीटीचे अर्थकारण

भारतात 2008 मध्ये पहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मची नोंदणी झाली. के.जी.एम.जी. मीडिया अँड एटंरटेनमेंटच्या 2018 च्या अहवालानुसार भारतात 2023 पर्यंत या व्यवसायात 45 टक्के वाढ होईल असे जाहीर केले होते. मात्र कोरोनाच्या टाळेबंदीने अवघ्या वर्षात 31 टक्के वाढ झाली. जगात ओटीटी प्लॅटफॉर्मची सर्वाधिक वेगाने वाढ भारतात होत आहे. भारताचे चित्रपट क्षेत्र प्रादेशिक भाषांमध्ये जसे विभागले गेले आहे तसेच या ओटीटी प्लॅटफॉर्मचे होत आहे. आजघडीला देशात 40 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म असून ही संख्या दरवर्षी प्रचंड वेगाने वाढलेली असेल. प्लॅनेट मराठी सारखे आणखी काही प्लॅटफॉर्मही मराठीतही येऊ घातले आहेत. पुढील वर्षभरात ओटीटी युजर्सची संख्या पन्नास कोटींवर गेलेली असेल. पुढील चार वर्षांत या व्यवसायाची वार्षिक उलाढाल वार्षिक 22 हजार कोंटीची झालेली असेल.

"ओटीटी'वर लवकरच बंधणे

ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, अ सुटेबल बॉय, तांडव, पाताल लोक अशा अनेक वेबसिरिजमधील प्रसंग वादाला निमंत्रण देणाऱ्या ठरल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे कोणतेच नियंत्रण नसल्याने त्यावरील वादग्रस्त प्रसारणाविषयी देशभरातील विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या. त्यांचे एकत्रीकरण करून सर्वोच्च न्यायालय यावर आपली निवाडा लवकरच देईल. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ओटीटी नियमनासाठी स्वायत्त संस्था व नियमावलीचे सुतोवाच केले आहे. या प्लॅटफॉर्मच्यावतीने इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया नावाने संस्था स्थापन करून स्वयंनियंत्रणाची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे एक सुसूत्र कायदेशीर व्यवसाय म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्म पुढे येईल.

Edited By- Archana Banage