
विविध अस्मानी संकटांवर मात करत कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झाले आहेत.
घाटनांद्रे (जि. सांगली) : विविध अस्मानी संकटांवर मात करत कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा निर्मितीसाठीचे शेडही सज्ज झाले आहेत. वेळोवेळी हवामान बदलल्याने, औषधे, खते, मजुरांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. म्हणून तो यावर्षी मोठ्या दराची अपेक्षा ठेवून आहे.
तालुक्यात द्राक्ष शेतीला पूरक वातावरण व दोन वर्षांपासून पावसाने चांगलाच हात दिल्याने, काही भागात म्हैसाळ व टेंभू योजनेचे पाणी आल्याने द्राक्ष क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्ष उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आगाप छाटणी घेतलेल्या बागांचा हंगाम सुरू झाला आहे.
आर्थिक खबरदारी म्हणून द्राक्ष उत्पादक शेतकरी रोख व्यवहारावर भर देत आहेत. अवकाळी, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणानेही द्राक्षशेतीला मोठा फटका बसला. दरम्यान, कोरोना महामारीमुळे परराज्यातील कामगार गावी गेल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा विविध प्रश्नांचा फटका सहन करत कशीबशी जतन केलेल्या द्राक्ष पिकापासून बळीराजा मोठ्या उत्पन्नाची आपेक्षा ठेवून आहे. द्राक्षाचा दर्जा, औषधे, खते, मजुरी यावर चालू वर्षी आतोनात खर्च झाल्याने द्राक्षाला चांगला दर मिळावा, किमान खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ तरी बसावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अद्याप परराज्यातील द्राक्ष व्यापारी दाखल झाले नसले तरी स्थानिक व्यापारी द्राक्ष खरेदी करताना दिसत आहेत. द्राक्ष दलाल नेहमीप्रमाणे रंगच नाही, गोडीच भरली नाही, वाहतुकीची समस्या, मालाला उठावच नाही अशी विविध कारणे पुढे करून दर पाडून मागत आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा बेदाणा निर्मितीकडे कल आहे. त्यासाठी मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची ते सांगोला दरम्यान हजारो शेडही उभारल्या जात आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी येथे येत आसतात. येथे निर्माण केलेल्या हिरव्या बेदाण्याला मोठी मागणी असते.
द्राक्ष खरेदीचे सध्याचे दर (रु. प्रति 4 किलो)
चांगला दर अपेक्षित
व्यापारीवर्ग विनाकारण विविध कारणे सांगून दर पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला बळीराजाने बळी न पडता योग्य दरानेच मालाची विक्री करावी. पुढे चांगला दर अपेक्षित आहे.
- विष्णू जाधव, द्राक्ष बागायतदार, घाटनांद्रे
संपादन : युवराज यादव