ऑक्‍सिजन सिलिंडरचे दर तीनपटीने वाढले...जिल्ह्यात टंचाई कायम : वाढलेल्या वाहतूक खर्चाचा परिणाम 

जयसिंग कुंभार
Tuesday, 15 September 2020

सांगली- कोरोनाच्या आपत्तीच्या काळात प्राणवायू ऑक्‍सिजन सिलिंडरचे दर तब्बल तीनपटीने वाढले आहेत. याला कारण मुख्यत्वे सांगली जिल्ह्यात येणारे ऑक्‍सिजन सिलिंडर दोन-अडीचशे किलोमीटरचा पल्ला पार करून येत आहेत. महामारीत सध्या कुशल मनुष्यबळाचा अभाव, वैद्यकीय साधनांच्या टंचाईत आता ऑक्‍सिजनची भर पडली आहे. 

सांगली- कोरोनाच्या आपत्तीच्या काळात प्राणवायू ऑक्‍सिजन सिलिंडरचे दर तब्बल तीनपटीने वाढले आहेत. याला कारण मुख्यत्वे सांगली जिल्ह्यात येणारे ऑक्‍सिजन सिलिंडर दोन-अडीचशे किलोमीटरचा पल्ला पार करून येत आहेत. महामारीत सध्या कुशल मनुष्यबळाचा अभाव, वैद्यकीय साधनांच्या टंचाईत आता ऑक्‍सिजनची भर पडली आहे. 

गंभीर कोरोना रुग्णांमध्ये फुफ्फुसाची क्षमता कमी होत जाते आणि शरीरात ऑक्‍सिजन पुरवठा कमी होत जातो. ऑक्‍सिजन पातळी 85-90 च्या खाली जाता कामा नये, हे वैद्यकीय ज्ञान सध्या सर्वसामान्यांनाही प्राप्त झाले आहे. त्या ऑक्‍सिजनची टंचाई, आता रुग्णालये आणि प्रशासनासमोरचे आव्हान आहे. सांगली जिल्ह्याला आजवर प्रामुख्याने कोल्हापूरमधून ऑक्‍सिजन पुरवठा व्हायचा. मात्र, एकूणच दोन्ही जिल्ह्यांमध्ये मागणी वाढल्याने ऑक्‍सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. तिथूनही पुरवठा होतो. मात्र, वाढीव मागणीमुळे सध्या सांगलीला पुणे, गोवा, बेळगाव, रत्नागिरी, सिन्नर, गुलबर्गा येथून ऑक्‍सिजन पुरवठा होत आहे. साहजिक दोन अडीचशे तीनशे किलोमीटरचे अंतर पार करून यावे लागत असल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. तिथेही वाहतूकदारांना अनेक तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकूणच त्याचा सिलिंडर दरावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती ओळखून प्रशासनाने औद्योगिक क्षेत्राचा सिलिंडर पुरवठा बंद केला आहे. धातू कापण्यासाठी तिथे त्याचा वापर होतो. आता तिथे पग कटिंग मशीनचा वापर होत आहे. हे मशीन एयर कॉम्प्रेसरवर चालते. 

जिल्ह्याची गरज किती? 
गंभीर रुग्णाला 90 ते 110 लिटर, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला 20 लिटर प्रति मिनिट ऑक्‍सिजनची गरज असते. याची सरासरी प्रति रुग्ण प्रति मिनिट 60 लिटर इतकी येते. जिल्ह्यात 600 रुग्णांना सध्या ऑक्‍सिजनची गरज भासतेय. म्हणजे जिल्ह्यात प्रति मिनिट 36 हजार लिटर ऑक्‍सिजनची गरज आहे. म्हणजेच तासाला 21 लाख 60 हजार लिटर ऑक्‍सिजनची गरज आहे. एक हजार लिटर म्हणजे एक क्‍युबिक मीटर ऑक्‍सिजन (एक बाय एक मीटरच्या बॉक्‍समध्ये साठवला जाणारा ऑक्‍सिजन) म्हणजेच तासाला 2 हजार 160 क्‍युबिक मीटर ऑक्‍सिजन लागेल. एका ड्युरा सिलिंडरची क्षमता 144 क्‍युबिक मीटर असते. म्हणजे तासाला 15 आणि दिवसाला 360 ड्युरा सिलिंडर ही जिल्ह्याची रोजची गरज आहे. 

सिलिंडर प्रकार क्षमता जुलैमधील किंमत सप्टेंबरमधील किंमत 

मिनी (रुग्णवाहिकेसाठी) 1.5 क्‍युबिक मीटर 60 रु. 130 रु. 
जंबो (शस्त्रक्रियागृहातील) 7 क्‍युबिक मीटर 190 रु 330 रु 
ड्युरा (व्हेंटिलेटरसाठी) 144 क्‍युबिक मीटर 2250 रु 6000 रु 

पुरवून वापर 
ऑक्‍सिजनच्या टंचाईमुळे डॉक्‍टर्सकडून तो पुरवून वापरला जात आहे. सर्व रुग्णांना जगवण्यास प्राधान्य देताना त्यांना कमी प्रमाणात ऑक्‍सिजन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचा हॉस्पिटलमधील, व्हेंटिलेटरवरील कालावधीही वाढत आहे. परिणामी खाट अडवून ठेवले जात आहेत. काही कोविड सेंटरमधील खासगी डॉक्‍टर्सनी हे वास्तव "सकाळ'कडे मांडले. जिल्ह्याची रोज 360 ड्युरा सिलिंडरची म्हणजे 6 केएलच्या सहा कंटेनरची गरज असून तितका पुरवठा होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात किमान 6 केएल क्षमतेचा (1 केएल म्हणजे लाख लिटर) ऑक्‍सिजन प्रकल्प उभारणीची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. आता त्याची सुरवात केली, तर किमान अडीच महिन्यात त्याची उभारणी होऊ शकते. 2.5 कोटींचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen cylinder rates tripled. Shortage persists in district: Consequences of increased transport costs