मशा-पश्‍या डोंगरावर ऑक्‍सिजन पार्क; जांभुळणीसह सहा गावांचे सिद्धनाथ श्रद्धास्थान

हमिद शेख
Tuesday, 6 October 2020

आटपाडी तालुक्‍यातील सहा गावांतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या जांभुळणी येथील सिद्धनाथ देवस्थान परिसर व मशा-पश्‍या डोंगरावर ऑक्‍सिजन पार्क साकारणार आहे.

खरसुंडी (जि . सांगली) : आटपाडी तालुक्‍यातील सहा गावांतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या जांभुळणी येथील सिद्धनाथ देवस्थान परिसर व मशा-पश्‍या डोंगरावर ऑक्‍सिजन पार्क साकारणार आहे. वृक्षारोपणासह काम सुरू झाले आहे. दुर्लक्षित "क' वर्गातील तीर्थक्षेत्राचा लवकरच ग्रामस्थांच्या सहभागाने कायापालट होईल. 

मशा-पश्‍या डोंगर जांभुळणीपासून (ता. आटपाडी) दोन किलोमीटरवर आहे. हेमांडपंथी दगडी बांधकाम असलेले श्री सिद्धनाथांचे प्राचीन मंदिर येथे आहे. शतकाहून अधिक काळापासून तालुक्‍यातील कामथ, घाणंद, कटरेवाडी, मुढेवाडी, बनपुरीच्या ग्रामस्थांचे हे श्रद्धास्थान आहे. याच गावांना मानकऱ्यांचा मान आहे. जांभुळणी व घाणंदमधील गुरव समाज पूजाविधीची जबाबदारी सांभाळतो. अत्यंत भक्तिमय वातावरणात विविध उत्सव व विधी होतात. कोजागरी पौर्णिमेस श्री नाथांची यात्रा असते. त्याबरोबर रविवार व पौर्णिमेला भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी डोंगरावर येतात. 

कित्येक वर्षे डोंगरावर जाण्यासाठी धड रस्ता होता. प्रवास खडतर होता. भाविक अशा दुर्गम रस्त्याने पायी येत. यात्रेदिवशी जांभुळणीतून नाथांची-पालखी डोंगरावर येते. पाच गावांतील भाविक भक्तांबरोबर इतर गावातील भाविक यात्रेस हजेरी लावतात. त्यादिवशी जांभुळणीचे सर्व ग्रामस्थ जत्रा करतात. इतक्‍या मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात कोणत्याही देवस्थानाची जत्रा होत नाही. त्याचमुळे मंदिर परिसरात देणगीरूपाने मिळालेल्या निधीतून बराच भाग सुशोभित करण्यात आला आहे. 

जांभुळणीच्या ग्रामस्थ व भाविकांनी श्रीनाथ डोंगरावर जाण्यासाठी असलेला खडतर रस्ता दुरुस्त केला. वाहने मंदिरापर्यंत जाऊ लागली. अडचण दूर झाली. रस्ताही चांगला झाला आहे. मंदिर परिसर व इतर मिळून भाग 150 एकर क्षेत्रफळाच्या डोंगरावर जांभुळणी आणि घाणंदच्या ग्रामस्थांची महसूल सदरी नोंद असलेली जमीन आहे. तीर्थक्षेत्रास रस्ता चांगल्याप्रकारे झाल्यामुळे विकास होण्यास मदत झाली. श्रीनाथ डोंगरावर ऑक्‍सिजन पार्क झाल्यास तीर्थक्षेत्राचे महत्त्व वाढून चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते. त्या दिशेने जांभुळणीची वाटचाल सुरू आहे. 

पर्यटनस्थळ जिल्ह्यात ठरेल
दुर्लक्षित तीर्थक्षेत्राचा लवकरच कायापालट होईल. ऑक्‍सिजन पार्कसाठी लागेल ती मदत देण्यास तयार आहे. हे पार्क चांगल्याप्रकारे विकसित होईल. त्यानंतर पर्यटनस्थळ जिल्ह्यात अग्रेसर ठरू शकेल. 
- गोपीचंद पडळकर, आमदार 

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न

जांभूळणी येथील श्री नाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी लागणारी सर्व मदत करण्यात येईल. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाईल. 
- संगीता मासाळ, सरपंच 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen Park on Masha-Pashya Mountain; Siddhanath Mandir devotation place for six villages including Jambhulani