Vidha Sabha 2019 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत पी. एन., ऋतुराज पाटील यांना उमेदवारीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ५० उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (ता. २०) जाहीर होत असून, पहिल्या यादीतच जिल्ह्यातील माजी आमदार पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या यादीत राज्यातील ५० उमेदवारांची घोषणा होणार आहे.

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ५० उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (ता. २०) जाहीर होत असून, पहिल्या यादीतच जिल्ह्यातील माजी आमदार पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. पहिल्या यादीत राज्यातील ५० उमेदवारांची घोषणा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्‍चित आहे. आघाडीचे जागा वाटपाचे सूत्रही काल जाहीर झाले. त्यानुसार दोन्ही काँग्रेसला प्रत्येकी १२५ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित ३८ जागा ह्या घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत. यात जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आघाडीतील सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी नूतन जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे आग्रही आहेत.

२००९ च्या सूत्रानुसार आघाडीत जिल्ह्यातील १० पैकी सात जागा काँग्रेसला, तर तीन जागा राष्ट्रवादीला जातील. करवीर, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी हे मतदारसंघ काँग्रेसकडे राहतील. यापैकी शिरोळसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे; पण ‘स्वाभिमानी’ आघाडीत असेल तर काँग्रेसला ही जागा सोडावी लागणार आहे. तथापि, शाहूवाडी व इचलकरंजीत सद्यःस्थितीत काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाहीत. ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांची आमदार पाटील व हसन मुश्रीफ यांच्याशी असलेली मैत्री पाहता या जागेवर आघाडीचा उमेदवार उभा केला जाण्याची शक्‍यता नाही. 

काँग्रेसने गेल्या महिन्यात दहाही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; पण त्यापैकी करवीरमधून पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर मतदारसंघांतून सक्षम उमेदवारच नसल्याने काँग्रेसच्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत या दोन नावांची घोषणा होईल.

कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांनी काँग्रेसची उमेदवारी घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण छत्रपती घराण्याचाच निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय झालेला नाही. छत्रपती घराण्यातील उमेदवार नसल्यास ऐनवेळी कोणाच्या तरी गळ्यात ही उमेदवारी मारावी लागेल, अशी शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P N Patil and Ruturaj Patil in First Congress list