
सहकारातील 50 वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली.
कुरळप (जि. सांगली) : सहकारातील 50 वर्षांचा अनुभव असलेल्या पी. आर. पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी देणार आहे, अशी घोषणा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली. मार्चमध्ये दांडेगावकर यांची मुदत संपेल. त्याजागी दादांची नियुक्ती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष श्री. पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार झाला. माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, अरुण लाड, सुमनताई पाटील, शेखर निकम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, खासदार धैर्यशील माने, युवानेते प्रतीक पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, पुरुषोत्तम जगताप, अमर पाटील, सत्यजित देशमुख उपस्थित होते. "गाथा पांडुरंगाची' गौरवअंकाचे प्रकाशन झाले.
श्री. पवार म्हणाले,""कृषी व साखर कारखाना क्षेत्रातील दीर्घ अनुभव असणाऱ्या पी. आर. दादांची निवड योग्य ठरेल. जागतिक बदल, सहकारातील जाण असणाऱ्यांची गरज आहे. दादा पदाला न्याय देतील.''
ते म्हणाले,""भविष्यात उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. ऊसाच्या चोथ्यापासून वीजनिर्मिती व रेक्टीफाय स्पिरीट करावे. घरी वापरात येणारा ईएनजी गॅस तयार करा. राज्यातील सर्व साखर कारखान्यात ही व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी पी. आर. दादांसारखा नेता हवा.''
ते म्हणाले,""राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली पी. आर. दादांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात झाली. बापू सार्वजनिक क्षेत्रात कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी होते. त्यातीलच पी. आर. पाटील एक आहेत. सलग 51 वर्षे सहकारी साखर कारखान्यात संचालक, 25 वर्षे अध्यक्ष राहणे सोपे नाही.''
मंत्री जयंत पाटील म्हणाले,""दादांसारख्या ज्येष्ठांनी मला बेरजेचे राजकारण शिकवले. राजारामबापूंचा ठेवा निस्पृह माणसं. जो मला लाभला. दादांसाठी मी मंत्रिमंडळात असताना तो कायदा बदलून घेतला.''
पी. आर. पाटील म्हणाले,""कर्मवीर भाऊराव, शाहू महाराज, लोकनेते राजारामबापू हेच दैवत आहेत. अध्यक्षपदाच्या काळात जयंत पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली एका कारखान्याच्या चार शाखा झाल्या.''
खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मानसिंग नाईक, खासदार माने, मंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. विश्वजित कदम यांची भाषणे झाली. शंकरराव भोसले व सहकाऱ्यांनी सत्कार केला. विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, सारंग पाटील, बाबासाहेब पाटील, माणिकराव पाटील, विनायकराव पाटील, अविनाश पाटील, सारंग पाटील, जिल्हाधिकारी डॉ। अभिजित चौधरी, पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, इंद्रजित मोहिते, बाळासाहेब पाटील, संजीव पाटील, गौरव समिती अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, विजय पाटील उपस्थित होते.
शिट्या अन् हश्या
श्री. पवार बोलण्यासाठी उभे राहताच उपस्थितांनी शिट्ट्या वाजवल्या. त्यावर "आपण कुरळपमध्ये आहोत. चौफुल्यात नाही, असे ते म्हणताच हशा पिकला.
संपादन : युवराज यादव