पाचगणी पोलिसांची ‘ना घर का, ना घाट का’ स्थिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पोलिस ठाण्यासह पर्यटन मदत केंद्र अधांतरी; अधिकाऱ्यांचा नाही पत्ता

पोलिस ठाण्यासह पर्यटन मदत केंद्र अधांतरी; अधिकाऱ्यांचा नाही पत्ता

भिलार - पाचगणी पोलिस ठाण्यांतर्गत पर्यटन पोलिस मदत केंद्राचे उद्‌घाटन गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडले. मात्र, त्याला महिना उलटून गेला तरी हे केंद्र केवळ कागदावर क्रियाशील आहे. मुळात पाचगणी पोलिस ठाण्याच्या ज्या जुन्या इमारतीत पर्यटन पोलिस मदत केंद्राचे उद्‌घाटन झाले आहे, त्या इमारतीमधील मूळे पाचगणीचे पोलिस ठाणे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्यांची ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था झाली असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

पाचगणी आणि महाबळेश्‍वर या पर्यटनस्थळांवर होत असलेल्या पर्यटकांच्या गर्दीला नियंत्रण व नियमनासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून पाचगणीसाठी पर्यटन पोलिस केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. पाचगणी पोलिस ठाण्यासाठी नव्याने इमारत बांधल्याने त्यांची जुनी इमारत या पर्यटन पोलिस मदत केंद्रासाठी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी या केंद्राचे उद्‌घाटनही करण्यात आले. या केंद्राला एक स्वतंत्र सहायक पोलिस निरीक्षक, १५ पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात आली. केंद्राला सुमो गाडी आणि सात दुचाकी पल्सर गाड्या दाखल झाल्या. परंतु, अद्याप एकही कर्मचारी दाखल झालेला नाही. अगोदरच पाचगणीच्या नियमित सहायक पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली झाल्याने ठाण्याचा ‘चार्ज’ महाबळेश्‍वरच्या पर्यटन पोलिस केंद्राच्या सहायक पोलिस निरीक्षकांना दिला आहे. त्यामुळे पाचगणीच्या मूळ पोलिस ठाण्याला आणि नव्या पर्यटन पोलिसांना कारभारी केव्हा मिळणार, हाच संशोधनाचा विषय आहे. पर्यटन पोलिसांना आलेल्या गाड्या मात्र पोलिस ठाणे, पोलिस वसाहतीत धूळ खात पडून आहेत. त्यामुळे पाचगणीकरांना या पर्यटन पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. 
 

सध्या उन्हाळी हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. वाहनांच्या गर्दीने पाचगणीहून महाबळेश्‍वरला जाण्यासाठी दोन-दोन तास लागत आहेत. मग, गरजेच्या वेळी जर हे पर्यटन पोलिस नसतील तर पोलिस केंद्राचा उपयोग तरी काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर या गर्दीचा मोठा ताण पडत आहे.

महिलांच्या पर्स व मोबाईल चोरीचे सत्र सुरू 
मागील आठवड्यामध्ये एका पर्यटक महिलेची पर्स ‘धूमस्टाईल’ चोरट्यांनी लाबंवली. त्याचा अद्याप शोध लागला नाही. तसेच गेल्या सलग चार बुधवारी आठवडे बाजारात महिलांच्या पर्स व मोबाईल चोरीचे सत्र सुरू आहे. केवळ तक्रारी दाखल होत आहेत, तपास शून्य आहे. अशा स्थितीत पर्यटन पोलिस केंद्राचा उपयोग झाला असता. परंतु, पाचगणीचे पर्यटन पोलिस मदत केंद्र अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pachgani satara news pachgani police condition