पर्यटनासह देवदर्शनासाठी एसटीचे पॅकेज 

दौलत झावरे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

वेळेचे व पैशांचे नियोजन करताना अनेकांना अडचणी येतात. वेळेचे नियोजन झाले, तरी देवदर्शनास जाण्यासाठी लागणाऱ्या पैशांचे मात्र गणित जुळत नाही.

नगर : पर्यटन व देवदर्शनाची अनेकांच्या मनात इच्छा असते. परंतु वेळेचे व पैशांचे नियोजन करताना अनेकांना अडचणी येतात. वेळेचे नियोजन झाले, तरी देवदर्शनास जाण्यासाठी लागणाऱ्या पैशांचे मात्र गणित जुळत नाही. हीच प्रवाशांची अडचण राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने ओळखून पर्यटक व देवदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तिकिटाच्या दरातच हे पॅकेज असणार आहे. 

अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी "पॅकेज टूर' सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांच्या बैठकीत ही अभिनव योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या किमान 44 असणे गरजेचे आहे. 

सर्व प्रवाशांना नेमके कोठे जायचे याची सर्व माहिती घेऊन त्यांना तेथे जाण्या-येण्यासाठी लागणारे तिकिटाचे शुल्क आकारून त्यांना थेट गावातून बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

देवदर्शन व पर्यटनस्थळांना भेटीसाठी फक्त एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी केवळ तिकिटाचा दर घेतला जाईल. 

प्रवाशांच्या मुक्कामाच्या सोयीसंदर्भात एसटी प्रशासन प्रयत्न करणार आहे. मात्र, मुक्कामासाठी लागणारा खर्च व जेवण व नाश्‍त्याचा खर्च हा प्रवाशांनाच करावा लागेल. एसटीच्या या अभिनव योजनेच्या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. हा उपक्रम राज्याला प्रेरणादायी ठरणार आहे. 

हॉल्टिंग शुल्क नाही 
देवदर्शन व पर्यटनासाठी पूर्वी बस न्यायची म्हटले की, त्याचे भाडे व हॉल्टिंग चार्ज आकारला जात. मात्र, या पॅकेज टूरमध्ये असे शुल्क आकारले जाणार नाही. ही सुविधा फक्त देवदर्शन व पर्यटनासाठी आहे. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या बससाठी प्रासंगिक कराराचे नियम कायम राहतील. 

मागणी करताच बस उपलब्ध

राज्यातील पर्यटनक्षेत्र व देवदर्शनासाठी जाणाऱ्यांनी बसची मागणी करताच त्यांना बस उपलब्ध करून दिली जाईल. पॅकेज टूरच्या माध्यमातून देवदर्शन व पर्यटनाचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी विभाग नियंत्रक कार्यालयाशी संपर्क साधल्यास सर्व माहिती दिली जाईल. 
- विजय गिते, विभाग नियंत्रक, नगर 

मार्ग बदलणार नाही 
पॅकेज टूरमधून एसटी बस बुक केल्यानंतर प्रवाशांना रस्त्याने जाताना जर आणखी देवदर्शन किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याची इच्छा झाली. तर त्यामध्ये बदल करता येणार नाही. जो मार्ग ठरला तोच शेवटपर्यंत कायम राहील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Package of ST for sightseeing with tourism