बहाद्दर पद्माळेकरांनी महापुरात राखलं गाव 

धोंडीराम पाटील
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

शतकातील मोठ्या पुराने गावाला हबकवून टाकलं. पण याच महाप्रलयंकारी पुरात ते दहा-पंधराजण हटले नाहीत. गावातच थांबले होते. घरं आणि जनावरं राखत. त्यांना जीवाची पर्वा नव्हती. होती ती गावाची काळजी.

पद्माळे, जि. सांगली : पद्माळे. सांगलीपासून जवळ असलेलं मिरज तालुक्यातील छोटं गाव. सर्वात कमी शिकलेले पण, शहाणे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे वसंतदादा पाटील इथलेच. कृष्णा नदीपासून अवघ्या 200 मीटरवर वस्ती. साधारण 425 उंबरा. लोकसंख्या सुमारे 2700. विसाव्या शतकाच्या सुरवातीला आलेल्या पुरातसुद्धा सुरक्षित राहिलेलं खेडं. यंदा म्हणजे सन 2019 मधील जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टचा पहिला आठवडा गावाला आठवणीत ठेवणारा ठरला. शतकातील मोठ्या पुराने गावाला हबकवून टाकलं. पण याच महाप्रलयंकारी पुरात ते दहा-पंधराजण हटले नाहीत. गावातच थांबले होते. घरं आणि जनावरं राखत. त्यांना जीवाची पर्वा नव्हती. होती ती गावाची काळजी.
 
गावात आणि गावाभोवती सगळीकडे पाणीच पाणी. वीज नाही की, मोबाईलचे नेटवर्क. 10 जणांपैकी कोणाला काही झालं, लागलं खुपलं तर निरोप द्यायलाही पूर ओसरावा लागणार होता. पण जगण्याची आशाही धूसर असताना ते तग धरून होते. गावासाठी जागता पहारा देत होते. प्रचंड वेग असलेल्या पुराच्या पाण्यात मुक्या जनावरांना एकवेळ तरी वैरण मिळावी म्हणून धडपडत होते. रमजान सरदार मुलाणी, सुरेश पांडुरंग पाटील, दीपक बाबासाहेब पाटील, दिनेश आनंदा मोहिते, राहुल हणमंत पाटील, वैभव धोंडिराम पाटील, बाजीराव बाळासाहेब कोळी, रमेश पांडुरंग पाटील, गजानन बाबासाहेब पाटील, संदीप बबन मोहिते हे 10 जण तर बहाद्दर निघाले. त्यांच्यामुळं बरंच काही वाचलं. मनुष्य आणि जीवित आणि पशुधन हानीही. या 10 जणांसह अक्षय आप्पासाहेब जगदाळे आणि त्याचा जुळा भाऊ, सागर दत्तात्रय जगदाळे, पंडीत दत्तात्रय पाटील, रुपेश बाळू कोळी, कुलदीप रघुनाथ कदम आणि सुरेश हणमंत जगदाळे असेही काही लोक ठाण मांडून होते.

साधारणपणे 28 जुलैला पाणी वाढू लागलं पण, पाच आणि सहा जुलै कृष्णेने रुद्रावतार धारण करायला सुरवात केली. पाण्यानं आधी गावाला वेढा दिला. मग, गावातील रस्ते, गल्ली बोळ एकेक करीत गाव गिळायला सुरवात केली. दलित आणि चर्मकार वसाहत तर नदीकाठावरच. या वस्त्या आधी पाण्यात गेल्या. मग, हळूहळू सारा गाव आठ दहा फूट पाण्यात गेला. पण हे बहाद्दर "डट के रहना" म्हणत गावचे रखवालदार बनले. एकमेकांना धीर, आधार देत होते. खायला अन्न नाही. समोर महासागर पण प्यायला चांगले पाणी नाही. आता जगण्याचीही आशा उरली नव्हती. पाणी किती वाढले, आणखी किती वाढणार, दिवस कोणता तारीख काय हेही कळत नव्हते. बोलून बोलून एकमेकांशी किती आणि कसल्या गप्पा मारणार. काहीच कळंत नव्हतं. धीर सुटत चालला होता. पण, मुकी जनावरं बघून जीव तीळ तीळ तुटायचा. एक तास दिवस आणि एक दिवस आठवडा वाटंत होता.
 
गुरुवारी ब्रह्मनाळला होडी उलटून काहीजण बुडाले. बरेचजण वाचले. काही मृतदेह लगेच हाती लागले, तर काही बेपत्ता होते ते नंतर सापडले. या घटनेदिवशी व दुस-या दिवशी असे उरले सुरले शे-दिडशे महिला पुरुषांना बाहेर काढले होते. थांबायचंच म्हणून जे राहिले ते हे दहाजण. दिवस कसा तरी जायचा, रात्रंकाळरात्रच भासायची. कशी काढले असतील त्यांनी ते दिवस. कल्पना जरी केली तर अंगावर काटा उभा राहतो.

टेम्पो, ट्रॅक्टरने बॅट-या, मोबाईल चार्जिंग
पुरामुळे वीज बंद केली होती. मोबाईल नेटवर्क हळूहळू कमी होत गेले. नंतर बंदच झाले. एखाददुसरा कॉल यायचा आणि जोडला जायचा. नंतर तेही बंद झालं. किमान अंधारात चाचपडणं उरलं. त्यावर शक्कल लढवून बहाद्दरांनी टेंपो आणि ट्रॅक्टरच्या बटऱ्या काढून मोबाईल चार्जिंग केलं. या मोबाईलचीच काय ती सोबत त्यांना होती. 

जनावरं वाचली, कोंबड्या गेल्या...
गावात जनावरं म्हणाल तर 550-600. ती आयशर टेंपोतून कशीबशी बाहेर नेली. पण सांगली रस्त्यावर गावापासून एक किलोमीटरवर 600  कडकनाथ कोंबड्यांचा एक फार्म होता. पाणी वाढताच रमजानला चिंता लागली. तो आणि दोस्तांनी त्यांना वाचवण्यासाठी ऐन पुरात मध्यरात्री उंचवटा तयार केला. पण, प्रयत्न व्यर्थ गेले. त्या कोंबड्या आजतागायत दिसल्याच नाही.

"अन्न पाण्याची चिंता होती. भात, आमटीवर भागवलं. जगायची शाश्वती नव्हती. पूर ओसरेल याची खात्री नव्हती. पण, शेवटपर्यंत गाव सोडायचं नाही हे ठरवलं होतं. हे सारं कर्तव्य भावनेतून घडलं. आता सरकारनं जबाबदारी निभावून लोकांना पुरेसी मदत व भरपाई द्यावी ही अपेक्षा."
- बाजीराव कोळी, रमेश पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padmale village in Sangali saved by citizens.