`या` पैलवानाने पटकावले 75 हजाराचे पारितोषिक

सुहास कांबळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पिंपळनेर (सोलापूर) : येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानच्या तीन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त आज आयोजित केलेल्या नामवंत मल्लांच्या लक्षवेधी लढतीत कुर्डुवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलचा महारुद्र काळे याने पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलचा सुहास घोडगेवर मात करीत प्रथम क्रमांकाचा 75 हजार रुपयांचा इनाम पटकावला. 

अत्यंत अतितटीची ही लढत वेळखाऊ होईल असे वाटत असताना केवळ पाच मिनिटांच्या कालावधीतच झाली. अत्यंत चलाखीने महारुद्र काळे याने हस्ती डावाने सुहास घोडकेस चितपट केले. दुपारी साडेतीन वाजता ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान यात्रा कमिटीच्या वतीने कुस्ती मैदानाचे उद्‌घाटन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या सुमारे 75 निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात 100 रुपये इनामापासून 75 हजार रुपये इनाम देण्यात आले. 

दुसऱ्या क्रमांकासाठी 51 हजार रुपयांची इनामी कुस्ती इंदापूरचा परंतु पुण्यातील हनुमान आखाड्याचा मारुती कोकाटे व मूळचा करमाळ्याचा परंतु सध्या पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीचा मल्ल अनिल जाधव यांच्यात झाली. अर्धा तास सुरू असलेली ही लढत डाव-प्रतिडाव करीत बरोबरीत सुटली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बबनराव शिंदे, कुस्तीसम्राट अस्लम काझी, वस्ताद वामनभाऊ उबाळे, यात्रा कमिटीचे अभिमान लोंढे, विजयकुमार लोंढे, सतीश आवारे, हनुमंत जाधव, सचिन लोंढे, धनंजय मोरे, अनिल लोंढे, औदुंबर लोंढे उपस्थित होते. पंच म्हणून वस्ताद अर्जुन लोंढे, दत्तात्रय डांगे, गणेश लोंढे, जानमहमंद मुलाणी, महारुद्र राऊत, गणेश डांगे, जोतिराम घोडगे आदींनी काम पाहिले. प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या महारुद्र काळे याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palawan won the 75 thousand prize