
पामतेलाची आयात बंद झाल्यामुळे सरकीसह इतर सर्व खाद्यतेलांचे दर प्रतिकिलो वीस ते पंचवीस रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीचा फटका सामना जनतेला बसतो आहे.
वाळवा : पामतेलाची आयात बंद झाल्यामुळे सरकीसह इतर सर्व खाद्यतेलांचे दर प्रतिकिलो वीस ते पंचवीस रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीचा फटका सामना जनतेला बसतो आहे. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. सरासरी साधे सरकीचे तेल सध्या 130 ते 135 रुपये प्रति किलो झाले आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात दरवाढीच्या ज्वाळा पोहोचल्या आहेत.
खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक अटळ आहे. जेवण तयार करण्यासाठी तेल अनिवार्य आहे. सर्व साधारण सरकीचे तेल सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यानंतर भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीनचे तेल कुवतीनुसार जेवणात वापरले जाते. हॉटेल व्यवसायात पाम किंवा तत्सम वनस्पती तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. देशांतर्गत पातळीवर पाम वगळता इतर प्रकारच्या तेलाचे उत्पादन समाधानकारक होते. पामतेल मलेशियातून आयात केले जाते. ही आयात काही महिन्यांपासून बंद आहे.
दिवाळीआधी सरकीचे तेल घाउक बाजारात 105 ते 107 रुपये प्रति किलो होते. तोच दर घाउक बाजारात 128 रुपये झाला. हाच दर किरकोळ बाजारात 135 रुपये झाला. शेंगदाणा तेल गेल्या महिन्यात 150 ते 160 रुपये किरकोळ बाजारात होते. ते 170 रुपये प्रति किलो झाले आहे. 130 ते 135 रुपये प्रति किलो असणारे सूर्यफूल तेल 145 रुपये झाले. सर्व साधारण सरकी पाठोपाठ सोयाबीनचे तेल सामान्य माणसाला परवडते. तेही किलो मागे 15 ते 18 रुपयांनी घाउक बाजारात वधारले. हे दर घाउक बाजारातील आहेत. किरकोळ बाजारात त्यात सरसकट किलो मागे आठ ते दहा रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे तेलाचे काय करायचे हा फोडणीसारखा कडकडीत सवाल निर्माण झाला आहे. खाद्यतेल महाग झाल्यामुळे भेसळ वाढली आहे.
हॉटेल व्यवसायात खाद्यतेलाची गरज लक्षणीय असते. तिथे मोठ्या प्रमाणात पामतेल अथवा वनस्पती तेलाचा वापर होतो. पामतेलाची टंचाई निर्माण झाली असल्याने तो ताण इतर खाद्यतेलावर आला आहे. मोठ्या दरवाढीचा हे कारण प्रमुख मानले जाते. गरीब या महागाईत होरपळून जात आहेत. ग्रॅम आणि पावशेरने रोज तेल खरेदी करून गुजराण करणारा देशातील मोठा वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
ज्येष्ठ किराणा दुकान मालक शहर कोरे म्हणाले,""माझ्या आयुष्यात खाद्यतेलाचे दर इतके वाढले नव्हते. तेल कसे विकायचे हा प्रश्न आहे.''
पामतेलाची आयात थांबली आहे. त्यामुळे सर्व खाद्यतेला×चे दर कडाडले आहेत. अजून वाढ होईल. किरकोळ बाजारात साधे सरकी तेल 150 रुपये प्रति किलो वर जाऊ शकते, असा अंदाज आहे.
- सौ. मनीषा रोटे, खाद्यतेलाचे घाउक विक्रेते, इस्लामपूर.
हळहळ आहे. संताप आहे. पण पर्याय नाही. तेला शिवाय स्वयंपाक शक्य नाही. सरकार काही तरी करेल अशी अपेक्षा आहे.
- सौ. कविता येवले, गृहिणी, वाळवा.
संपादन : प्रफुल्ल सुतार