"लॉकडाउन' मध्ये पलूस पोलिसांनी इतके गुन्हे नोंदवले...कोरोना रोखण्यासाठी प्रभावी कामगिरी 

संजय गणेशकर 
रविवार, 31 मे 2020

पलूस (सांगली)- पलूस पोलिसांनी लॉकडाउन काळात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. 

पलूस (सांगली)- पलूस पोलिसांनी लॉकडाउन काळात आतापर्यंत 252 गुन्हे दाखल केले. तर तब्बल चार लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. 
पलूस पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पलूस शहरासह काही गावांचा समावेश होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली. तसेच कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे, मद्य विक्री, तंबाखू जन्य पदार्थ विक्री, हॉटेल, बेकरी व इतर खाद्यपदार्थ विक्री यावर बंदी घातली. काही काळ इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच दुचाकीवरून डबल सिट व चारचाकी मधून चालकासह तीन पेक्षा जादा प्रवासी असणे, तोंडाला मास्कचा वापर न करणे, राज्य व जिल्हा बंदी असतानाही आदेशाचा भंग करुन प्रवेश करणे, रस्त्यावर विनाकारण फिरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे अशा विविध सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर पलूस पोलिसांनी करडी नजर ठेवून रात्रंदिवस काम केले. 

पलूस शहरासह इतर गावात नाकेबंदी केली. कडक पहारा ठेवला. मात्र शासन आदेशाचे व नियममांचे पालन न करणाऱ्यांवर पलूस पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षक, माजी सैनिक आणि पोलिस मित्रांची साथ मिळाली. लॉकडाउन सुरू झालेपासून पलूस पोलिसांनी राज्य व जिल्ह्याबाहेरुन विनापरवाना आल्याप्रकरणी 3, बंद काळात दुकान सुरू ठेवणारे 3, मास्कचा वापर न करणारे 193, आणि संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 43 अशा एकूण 252 जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला. 
पलूस पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य केले. होम क्वारंटाईन नागरिक घराबाहेर पडू नयेत, यासाठी पोलिसांनी करडी नजर ठेवली. त्यांच्या घरावर लेबल चिकटवण्याचे काम सुध्दा पलूस पोलिसांनी केले. रस्त्यावर व इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली. सुदैवाने पलूस तालुक्‍यात एकही कोरोना रुग्ण आतापर्यंत सापडला नसून यामध्ये पोलिसांचे मोठे योगदान आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक अझहरूद्दीन शेख आदी पोलिसांनी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. 

""पलूस पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात लॉकडाउनपासून पोलिस कर्मचारी, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या इतर विभागाने चांगले काम केले. सुदैवाने याठिकाणी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यामध्ये नागरिकांनी मोठे सहकार्य केले. यापुढेही समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे.'' 
-विकास जाधव, (सहाय्यक पोलीस निरिक्षक,पलूस) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palus police reported so many crimes in the "lockdown"