
पलूस तालुक्यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली.
पलूस (जि. सांगली) ः पलूस तालुक्यात झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणूकीत 9 ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने बाजी मारली. तर 3 ठिकाणी आघाडीची सत्ता आली. भाजपाला एकही जागा मिळाली नाही. भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे.
भिलवडी, दह्यारी, धनगांव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता गमावली आहे. त्याठिकाणी कॉंग्रेसने सत्ता काबीज केली आहे. पलूस तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणूकिसाठी ता.15 रोजी मतदान झाले होते. आज सकाळी 10 वाजता पलूस येथील मध्यवर्ती शासकीय ईमारतीत मतमोजणी सुरू झाली आणि दुपारी 12 वाजता मतमोजणी पूर्ण झाली. मतमोजणीबाबत प्रचंड उत्सुकता होती.
या निवडणूकीत आंधळी, तुपारी, दह्यारी, बुरुंगवाडी, धनगांव , नागठाणे, माळवाडी व भिलवडी आदी ठिकाणी कॉंगेसने सत्ता मिळवली. रामानंदनगर व नागराळे येथे कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची तर सुर्यगाव येथे सर्वपक्षीय जय स्वामी समर्थ ग्राविकास पॅंनेलची सत्ता आली.
भिलवडी या मोठ्या गावात भाजपाची सत्ता होती. ही सत्ता कॉंग्रेसने उलथवून लावली. कॉंग्रेसने 17 पैकी 13 तर भाजपाप्रणीत पॅंनेलला 4 जागांवर समाधान मानावे लागले. भिलवडी येथील पराभव भाजपाला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. भिलवडी बरोबरच दह्यारी आणि तावदरवाडी ग्रामपंचायतीतही भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. दह्यारी येथे 7 पैकी 4 जागांवर कॉंग्रेसने तर 3 जागावर भाजपाने विजय मिळवला. धनगांव येथे 9 पैकी 6 जागांवर कॉंग्रेसचे तर 3 जागांवर विरोधी पॅंनेलचे उमेदवार विजयी झाले. आंधळी येथे 11 पैकी 8 जागांवर कॉंग्रेसचे तर 3 जागांवर राष्ट्रवादी- भाजपा प्रणीत आघाडीला यश मिळाले.
तुपारी येथे 9 पैकी 8 जागांवर कॉंग्रेस तर एका जागेवर भाजपाचा उमेदवार निवडून आला. मोराळे येथे सर्व येथे कॉंग्रेस प्रणीत पॅंनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. माळवाडी येथे कॉंग्रेस प्रणीत पॅंनेलने 13 तर विरोधी पॅंनेलला 2 जागा मिळाल्या.नागठाणे येथे कॉंग्रेस 9 तर भाजपाने 6 जागा जिंकल्या. सूर्यगाव येथे सर्व 7 जागांवर जय स्वामी समर्थ पॅंनेलचे उमेदवार विजयी झाले.
नागराळे येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत पॅंनेलने 6 तर विरोधी पॅंनेलने 5 जागा जिंकल्या.मतमोजणी झालेनंतर विजयी समर्थक पॅंनेलच्या कनेते व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. तहसीलदार निवास ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संपादन : युवराज यादव