esakal | बांधकाम क्षेत्राला पालवी; दीडशेंवर फ्लॅटस्‌ची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Palvi to the construction sector; Sale of one and a half hundred flats

कोरोना आपत्तीच्या फटक्‍याने हैराण बांधकाम आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राला दिवाळी पाडव्याने काहीसा बुस्टर डोस दिल्याचे चित्र दिसले. शहरात नव्याने 20 नव्या गृहप्रकल्प योजना म्हणजे पाचशेंवर फ्लॅटस्‌च्या कामांना सुरवात झाली.

बांधकाम क्षेत्राला पालवी; दीडशेंवर फ्लॅटस्‌ची विक्री

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : कोरोना आपत्तीच्या फटक्‍याने हैराण बांधकाम आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राला दिवाळी पाडव्याने काहीसा बुस्टर डोस दिल्याचे चित्र दिसले. शहरात नव्याने 20 नव्या गृहप्रकल्प योजना म्हणजे पाचशेंवर फ्लॅटस्‌च्या कामांना सुरवात झाली. डिसेंबरपर्यंतच मुद्रांक शुल्कातील 50 टक्के कपात, महानगरांतील मंदीचे सावट, सोन्याचे वाढलेले दर यामुळेही सांगली-मिरजेतील बांधकाम क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला. 

दरवर्षी महापालिका क्षेत्रात जवळपास चाळीसहून अधिक नव्या बांधकाम प्रकल्पांना सुरवात होते. यावेळी ते प्रमाण निम्म्याने असले तरी दिलासा देणारे आहे. "क्रेडाई' चे राज्य कार्यकारणी सदस्य दीपक सूर्यवंशी म्हणाले,""महापूर आणि कोरोना अशा आपत्ती सांगली परिसराला वेढणाऱ्या ठरल्या. या पार्श्‍वभूमीवर पाडव्याला मिळालेला प्रतिसाद चांगला ठरला. विश्रामबाग लगत मिरज रस्त्याच्या दुतर्फा उपनगरांत नव्या गृहप्रकल्पांना सुरवात होत आहे. मागील शिल्लक आठशे-नऊशे प्लॅटस्‌नाही चांगला उठाव आहे. रेडी पझेशनमुळे बाजारपेठेत जसजशी हालचाल होईल त्या प्रमाणात फ्लॅटस्‌ची विक्री होईल. पुण्या-मुंबईच्या तुलनेत सांगलीसारख्या छोट्या शहरांकडे ग्राहक वाढल्याचे दिसते.'' 

सांगली क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे म्हणाले,""महापूरानंतर राम मंदिरपुढे मिरजेच्या दिशेने स्कीम्सचे प्रमाण वाढले. ते आत्ताही कायम आहे. विश्रामबागमध्ये जागांचे दर वाढल्यानेही हा परिणाम आहे. विश्रामबागलगत उपनगरांत तेरा ते वीस लाखांपर्यंत गुंठ्याचे दर आहेत. त्यामुळे प्रति फ्लॅटचे दरात जमीन दराचा वाटा कमी होऊन 2800 ते 3800 रुपयांपर्यंत प्रतीचौरस दर राहिलेत. 

कोरोना आपत्तीनंतरही दर स्थीर आहेत. रेडी पझेशनमुळे ग्राहकांना डोळ्यासमोर पाहून प्लॅट खरेदीची संधी आहे. कायद्याप्रमाणे आठ प्लॅटस्‌वरील सर्वच स्कीम्स रेरा नोंदणीकृत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकात सुसंवादाचे चांगले वातावरण तयार झाले आहे. एका कठीन काळातून बांधकाम क्षेत्र बाहेर पडत आहे.'' 

मार्जीन मनीसाठी मदतीला सोने 
शेअर मार्केटमधील घसरण, व्याजदरातील कपात, सोन्याचे वाढीव दर हे बांधकाम व स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या पथ्यावर पडल्याचे निरिक्षण बांधकाम व्यावसायिकांचे आहे. त्याचे चांगले परिणाम येत्या काही दिवसात पुन्हा दिसतील असेही त्यांना वाटते. विशेषतः बॅंकाच्या कर्जमंजुरीवेळी मार्जीन मनीचा प्रश्‍न अनेक ग्राहकांनी घरातील सोने विक्री करून सोडवल्याचे दिसून आले. सोने विक्रीतून मिळालेली चांगली रक्कम आणि बॅंकांनी मार्जिन मनी कमी करत अधिकाधिक कर्ज मंजुरी जलदपणे केल्याने या पाडव्याला जलदगतीने फ्लॅट विक्रीची प्रक्रिया झाल्याचे स्पष्ट झाले.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image